वंचित आघाडीला समान चिन्ह नाही; पाचही मतदारसंघांमध्ये वेगवेगळी निशाणी

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये पाच मतदारसंघांमध्ये वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. त्यात गॅस सिलिंडर, रोड रोलर, ऊस पिकवणारा शेतकरी या चिन्हांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांना काही दिवसांपूर्वी निवडणूक चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. त्यात गॅस सिलिंडर, शिट्टी आणि रोड रोलरचा समावेश होता. सर्वच मतदारसंघांमध्ये यातील एकच समान चिन्ह मिळावे अशीही विनंती केली होती. मात्र निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात वंचितच्या उमेदवारांना वेगवेगळय़ा निशाण्या दिल्या आहेत.

रामटेक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर हे चिन्ह देण्यात आले आहे. नागपूरमध्ये वंचितने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. भंडारा मतदारसंघात वंचितला ऊस पिकवणारा शेतकरी ही निशाणी मिळाली आहे. गडचिरोलीत गॅस सिलिंडर, तर चंद्रपूरमध्ये रोड रोलर हे चिन्ह वंचितला मिळाले आहे.