IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात होणार मोठा बदल… वाचा काय आहे कारण

IPL 2024 च्या सतराव्या हंगामाचे जोरदार वारे सध्या देशामध्ये वाहत आहेत. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते सुद्धा मोठ्या संख्येने स्टेडियमवर हजेरी लावत आहेत. आपापल्या संघांना समर्थन देण्यासाठी सामन्यांच्या वेळापत्रकावर सर्वांच्या नजरा असतात. अशातचं कोलकाता आणि राजस्थानच्या एका सामन्याची तारीख बदलणार असल्याचे वृत्त आले आहे.

आयपीएलच्या सतराव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आणि पाहता पाहता 13 सामने सुद्धा झाले. सर्वच संघ जिंकण्यासाठी कडवी झुंज देत आहेत. चाहते सुद्धा आपापल्या संघाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने स्टेडियमवर हजेरी लावत आहेत. मात्र राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 17 एप्रिल रोजी कोलकाता आणि राजस्थान रॉयल्य यांच्यामध्ये ईडन गार्डन्सवर लढत होणार होती. मात्र या सामन्याची तारीख किंवा मैदान बदलणार असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 17 एप्रिल रोजी होणाऱ्या कोलकाता विरुद्ध राजस्थान हा सामना कोलकात्ताच्या ईडन गार्डन्सवर न होता इतर कोणत्या तरी मैदनावर होणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिले आहेत. 17 एप्रिल रोजी श्री राम नवमी असल्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच लोकसभेच्या तारखा सुद्धा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय या सामन्याचे वेळापत्रक बदलु शकते. यासंदर्भात बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) कोलकाता पोलिसांच्या संपर्कात आहेत. सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याचे बीसीसीआयने दोन्ही संघमालकांना कळवले आहे. मात्र अद्याप तरी सामन्याच्या वेळापत्रकामध्ये कोणातही बदल करण्यात आलेला नाही.