निवडणूक रोखे घोटाळ्याची चर्चा रोखण्यासाठीच केजरीवालांना अटक, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

निवडणूक रोखे घोटाळय़ामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा लाभार्थी आहे. भाजपचा खरा चेहरा त्यामुळे उघड झाला आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची चर्चा होऊ नये आणि लोकांचे लक्ष विचलित व्हावे यासाठीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पक्षाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला. अरविंद केजरीवाल यांनी देशातील हुकूमशाहीविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन देशातील विरोधी पक्षांना केले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या होत्या. ‘मातोश्री’ निवासस्थानीही ते आले होते असे सांगतानाच, केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावर झालेली अटक निषेधार्ह असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीत चांगला समन्वय

महाविकास आघाडीत समन्वय नाही, जागावाटपावरून पेच आहे, अशा पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी महायुतीत तरी कुठे समन्वय आहे? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. शिवसेना-भाजपशी युती होती त्यावेळीही जागांवरून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेचाखेच असायची, पण शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्व एकत्रपणे काम करायचे, याची आठवण त्यांनी करून दिली. महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय असून आम्ही जिंकण्याच्या ईर्षेने लढतोय, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करू असेही त्यांनी सांगितले. ़

महाराष्ट्रातील जनतेत भाजपबद्दल प्रचंड संताप

महाराष्ट्रातील लोकांच्या मनात भाजपबद्दल प्रचंड संताप आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात आपण जिथे जातोय तिथे लोकांची गर्दी होतेय. ज्या पद्धतीने गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले आणि गद्दारांचे सरकार बसवले गेले त्याबद्दल लोकांमध्ये संताप आणि उद्वेग आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणवीसांचा संपूर्ण खर्च करतो, त्यांनी मणिपूर, लडाखला जावे

राहुल गांधी ‘वीर सावरकर’ सिनेमा पाहायला तयार असतील तर मी संपूर्ण थिएटर बुक करायला तयार आहे असे उपरोधिक विधान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याबाबत माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारले. त्यावर ते म्हणाले की, फडणवीसांचा संपूर्ण खर्च करण्यास मी तयार आहे, त्यांनी मणिपूर आणि लडाखला जावे. दार्जिलिंगमध्ये जाऊन नीरज झिंबा यांची भेट घ्यावी आणि त्यांना भाजपने दिलेली वचने कशी मोडली त्याची माहिती घ्यावी. कश्मिरी पंडितांना भेटावे. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे भाजपवाले आता बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यातीलच एखादा प्रोडय़ूसर घेऊन फडणवीसांनी ‘मणिपूर फाईल्स’ पिक्चर काढावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

अटलबिहारी वाजपेयींच्या काळात विचारांवर, तत्त्वावर चालणारी भाजपा वेगळी होती. सध्याचा भाजपा हा केवळ भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे. पूर्वी नैसर्गिक युती असायची, सध्याची महायुती नैसर्गिक आहे का?

भाजप चित्रविचित्र नेत्यांना सोबत घेतेय

छोटय़ा-छोटय़ा पक्षांना आणि नेत्यांना भाजप पक्षात घेत असल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता, भाजपकडून चित्रविचित्र नेत्यांना सोबत घेतले जात आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. मनसे आणि भाजपच्या जवळीकीबद्दल बोलताना, बुडणाऱयाला काडीचा आधार, या म्हणीची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. बुडणारी भाजप काडी काडी एकत्र करून पोहण्याचा प्रयत्न करतेय, असे ते म्हणाले.

भाजपचाच परिवार आता भ्रष्ट परिवार झालाय

भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी आहे, असा भीमटोला लगावतानाच प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कुणी केला होता? 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणी केला होता? आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणाचा होता? कर्नाटकातील जनार्दन रेड्डी, नवीन जिंदालप्रकरणी आरोप कुणाचे होते, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. भाजपने इतरांवर घराणेशाहीचे आरोप केले होते, आता त्यांचाच परिवार भ्रष्ट परिवार झाला आहे, असा जोरदार हल्लाही उद्धव ठाकरे यांनी केला.

सगळे ठग भाजपात गेल्याने आम्ही ठगमुक्त झालो – संजय राऊत

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही यावेळी भाजपावर टीका केली. इंडिया आघाडीच्या मेळाव्याला ठगांचा मेळावा असे भाजपने संबोधले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी, सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत, असे जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपची सध्या केविलवाणी धडपड सुरु आहे. खरे ठग कोण आहेत, हे निवडणूक रोख्यांचे भांडे फुटल्यामुळे सर्वांसमोर आलेले आहे. ठगांचा मेळा त्यांच्याकडेच आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व मुख्य ठग त्यांच्याकडे गेल्यामुळे पक्ष आता मोकळा झाला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल हे ठग होते. हे मी किंवा उद्धव ठाकरे यांनी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितले आहे. त्यांनी सगळे ठग घेतल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो, असे संजय राऊत म्हणाले.