मंडीत संकट आले, तेव्हा कंगना कुठे होती? काँग्रेसचे टिकास्त्र

लोकसभा निवडणुकांसाठी आता प्रचार वेग धरत आहे. तसेच विविध पक्ष एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहे. भाजपने हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून अभिनेत्री कंगना राणावत हिला उमेदवारी दिली आहे. यावरून काँग्रेसने भाजप आणि कंगनावर टिकास्त्र सोडले आहे. मंडीमध्ये जेव्हा संकट आले, तेव्हा कंगना कुठे होती, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

हिमाचल प्रदेशमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी कंगना राणावतवर टीकास्त्र डागले आहे. मंडीत दुर्घटना घडली, रस्ते खराब झाले, पूल वाहून गेले, तेव्हा कंगना कुठे होती? असा सवाल त्यांनी केला आहे. जेव्हा मंडीतील लोक दुःखात होते तेव्हा कंगना कुठे होती?, मंडीतील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर त्यांनी मुंबईला धाव घ्यायची का? असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांना मंडीच्या रिंगण्यात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. या जागेवर प्रतिभा सिंह यांनी निवडणूक लढवल्यास कंगनापुढील आव्हाने वाढणार आहेत. त्यातच आता काँग्रेसने अनेक सवाल करत कंगनाला घेरले आहे. कंगना निवडणूक जिंकणे कठीण आहे. ती जिंकली तरी ती मंडी येथे राहणार का? मंडीतील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का? निवडणूक जिंकल्यानंतर कंगना ब्लॉक स्तरावर जाणार का? तिला पंचायतींच्या समस्या समजतील का? असे सवाल विक्रमादित्य यांनी करत कंगनाला कोंडीत पकडले आहे.