कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात भाजपची मुजोरी; परीक्षा सुरू असतानाच विद्यार्थ्यांवर भाजपच्या सभेला हजर राहण्याची सक्ती

कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात भाजपची मुजोरी समोर आली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतानाच त्यांना राजकीय सभेला हजर राहण्यास सांगण्यात आले. भाजपचे उत्तर मुंबईचे लोकसभा उमेदवार पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी त्यांचे चिरंजीव यांचे भाषण ठाकूर महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र जप्त करून त्यांना सभागृहात उपस्थित राहण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपच या सभेत उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने कार्यक्रम सुरू असतानाच केला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच भाजपकडून मुंबईत आचारसंहितेचा भंग सुरू आहे. परीक्षेचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा असतो. नेमके याचवेळी परीक्षा सुरू असतानाच ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर जोरजबरदस्ती करून त्यांना राजकीय व्यक्तींच्या सभेला हजर राहण्यास सांगितले. ठाकूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या या भाजपच्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी काहीही संबंध नव्हता. तरीदेखील केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मुलाच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तोबा गर्दी महाविद्यालय प्रशासनाने जमा केली होती.

युवासेना आक्रमक; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना विचारला जाब
भाजपने ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकसभा उमेदवार पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी जबरदस्तीने महाविद्यालयाच्या सभागृहात बसवून ठेवले. ही संतापजनक गोष्ट असून विद्यार्थ्यांनीही याला जाहीर विरोध केला आहे. असे असतानाही महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता भाजपसाठी महाविद्यालयात पायघडय़ा अंथरत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने केला आहे. या सर्व प्रकाराला कुलगुरूंचा छुपा पाठिंबा असल्याचा दाट संशय युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी व्यक्त केला आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन सर्व महाविद्यालयांना तातडीने असे न करण्याच्या सूचना द्याव्यात अथवा युवासेना आपल्या कार्यालयाबाहेर धरणा आंदोलन करेल, असा इशाराही कुलगुरूंना देण्यात आला.

देशात लोकशाही रहावी, अशी दिल्लीश्वरांची ईच्छा नाही
देशात लोकशाही रहावी, अशी दिल्लीश्वरांची ईच्छा नाही, असे ट्विट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. भाजपच्या उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या मुलाच्या भाषणाला ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, यासाठी त्यांचे महाविद्यालयाचे प्रवेशपत्र जप्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या एक दिवस आधीच हा भयंकर प्रकार घडला, असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सरकारलाही वाटत असेल… उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्याकडे नोकऱया कुठे आहेत? त्यापेक्षा भाजप उमेदवाराच्या मुलाने घेतलेल्या सभेतच त्यांचा वेळ वाया घालवा… असा खोचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. महाविद्यालयातच अशा शिक्षणविरोधी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱया प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई होईल का, असा सावलही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.