महाविकास आघाडीचे जागावाटप दोन दिवसांत; नाना पटोले यांची माहिती

NANA-PATOLE

महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबत आजही चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन-तीन दिवसात जाहीर होतील, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलणी केली. जागावाटपाबरोबर प्रचार सभा व इतर मुद्दय़ांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व 48 जागा महाविकास आघाडीत लढवत आहे. काही जागांची अदलाबदल होऊ शकते आणि याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होईल, असे पटोले म्हणाले.

गुजरातमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे, महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान घेण्याची काही गरज नव्हती परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान घेतले जात आहे, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली.या पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश प्रवत्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.