हे पहिल्यांदाच उलटं होतंय, मुंबई महापालिका ‘एमएमआरडीए’ला पैसे देतंय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबई महानगर पालिकेच्या ठेवींवर मिंधे सरकार राजरोसपणे दरोडा टाकत असून या ठेवींमधून ‘एमएमआरडीए’ला ‘मेट्रो’साठी तब्बल एक हजार कोटींचे ‘गिफ्ट’ देण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे. मुंबई महापालिका एमएमआरडीएला पैसे देतेय, हे असे पहिल्यांदाच उलटं होत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसेनेची सत्ता असताना मुदत ठेवी 600 कोटींहून 92 हजार कोटींपर्यंत पोहोचल्या होत्या, मात्र इकबाल सिंह चहल यांच्या काळात त्या 84 हजार कोटींपर्यंत पोहोचल्या. याचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला.मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत असताना आम्ही बेस्ट कर्मचाऱ्यांचा पीएफ, ग्रॅच्युटी सर्व करून द्यायचो. मी स्वत: या संबंधित बैठकीत बसून राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला पैसे आणून दिले आहेत. मात्र हे पहिल्यांदाच उलटे होत असून मुंबई महापालिका एमएमआरडीएला पैसे देतेय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेल्या अडीच वर्षापासून एकही नगरसेवक नाही, महापौर आणि कमिटीही नाही. प्रशासक म्हणून कार्य करणाऱ्या इकबाल सिंह चहल यांनी हवे तसे पैसे खाल्ले आणि वरतीही पोहोचवले. नुकतीच त्यांची निवडणूक आयोगाने हकालपट्टी केली. अन्यथा अजूनही त्यांना त्या पदावर ठेवले असते. कारण ते ‘विकली रिचार्जर’ होते.