काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या पंगू बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न, सोनिया गांधी यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठवली आहेत. यामुळे निवडणुकीचा खर्च करण्यासाठी काँग्रेसला हात आखडता घ्यावा लागत आहे. याच मुद्द्यावरून आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या पंगू बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात सोनिया गांधी यांनी केला.

आम्ही लोकशाही वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. इलेक्टोरल बॉण्डमुळे भाजपचा फायदा झाला आहे, तर दुसरीकडे जनतेकडून मिळालेला आमचा निधी गोठवला जात आहे. आमच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत. काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांकडून पद्धतशीरपणे सुरू आहे. हा गंभीर प्रकार असून याचा केवळ काँग्रेसवरच नाही तर लोकशाहीवरही परिणाम होत आहे. या आव्हानात्मक स्थितितही आम्ही निवडणूक प्रचाराचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

आम्हाला पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करता येत नाहीय. आमची खाती गोठवण्यात आली आहेत. आम्हाला जनतेकडून मिळालेल्या निधीचा वापर आम्हाला करता येत नाहीय. जाहिरातींसाठीही पक्षाकडे पैसे नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. लोकशाहीमध्ये निवडणूक निष्पक्ष व्हायला हवी. सत्तेत असलेल्यांची संसाधनांवर, माध्यमांवर मक्तेदारी असावी, तसेच आयकर विभागा, ईडी, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर सत्ताधारी पक्षाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असावे, असे होऊ नये. आमची गोठवलेली बँक खाती पुन्हा सुरू करा, अशी मागणी खरगे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर इलेक्टोरल बॉण़्डबाबत जे तथ्य समोर आले ते चिंताजनक आणि लाजिरवाणे आहे. यामुळे देशाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. देशात गेल्या 70 वर्षापासून निष्पक्ष निवडणूक आणि निरोगी लोकशाहीचे चित्र बनले होते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्डला बेकायदेशीर आणि असंवेधानिक ठऱवले. याद्वारे सत्ताधाऱ्याच्या खात्यात हजार कोटी आले, तर दुसरीकडे षडयंत्र करून प्रमुख विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले. सत्ताधाऱ्यांचा हा खेळ धोकादायक असून याचा लोकशाहीवर दुरगामी परिणाम होईल, असेही खरगे म्हणाले.

राजकीय पक्षांना आर्थिकदृष्ट्या पंगू बनवून निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाही. इलेक्टोरल बॉण़्डच्या माध्यमातून भाजपला 56 टक्के, तर काँग्रेसला केवळ 11 टक्के पैसे मिळाले. यासह भाजपकडे येणाऱ्या रोख पैशांचा हिशोब नाही. टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, वर्तमानपत्रामध्ये भाजपच्या कोट्यवधींच्या जाहिराती रोज येत आहेत. सभा, रोड शो सुरू आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपने फाईव्ह स्टार कार्यालय थाटले आहे. हा पैसा कुठून आला? पैशांशिवाय हे उभे राहील का? असा सवालही खरगे यांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी यांनीही यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बँक खातीच नाही तर देशातील लोकशाही गोठवली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. एक महिन्यांपूर्वी कांग्रेसची सर्व खाती गोठवण्यात आली. निवडणूक आयोगानेही यावर मौन धारण केले आहे. आम्ही प्रचार करू शकत नाही, आमच्या नेत्यांना विमान, रेल्वेने प्रवास करता येत नाहीय. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांद्वारे आम्हाला आर्थिकदृष्ट्या पंगू केले जात आहे. देशात लोकशाही राहिलेली नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.