100 कोटींचे कोकेन जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर गजाआड

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) थाई देशाच्या रहिवासी असलेल्या महिलांकडून सुमारे 100 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. तसेच ड्रग तस्करीमध्ये सक्रिय असणाऱया आफ्रिकन नागरिक आणि त्याच्या साथीदार अशा चौघांना डीआरआयने अटक केली. 100 कोटींचे कोकेन पकडल्याची यंदाच्या वर्षातील ही पहिलीच घटना आहे.

हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून परदेशी तस्कर हे कॅरिअरच्या माध्यमातून ड्रग तस्करी करत असल्याचे चित्र आहे. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडोनेशियन आणि थाई देशाची रहिवासी असलेल्या महिला आल्या. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्याने बॅगेच्या आत विशिष्ट कप्पा करून 9.829 किलो कोकेन लपवले होते. त्या दोघी आदिस अबाबा, इथिओपिया मुंबईत विमानाने आल्या होत्या. त्या दोघींच्या चौकशीत डीआरआयला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतर डीआरआयचे पथक दिल्ली येथे गेले. डीआरआयने ग्रेटर नोएडा येथे एका ठिकाणी रात्रभर फिल्डिंग लावून एका आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेतले. अधिकाऱयांना धक्काबुक्की करून तो पळून जात होता. डीआरआयच्या अधिकाऱयाने पाठलाग करून त्याला पकडले. पाठलाग करत असताना आरोपी आणि डीआरआयचे अधिकारीदेखील जखमी झाले. तसेच आफ्रिकन नागरिकाच्या साथीदारालादेखील ताब्यात घेऊन अटक केली.