शिवरायांच्या जयघोषाने फोर्ट परिसर दुमदुमणार

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी गुरुवार, 21 मार्च रोजी ‘स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने भव्य ‘शिवराय संचलन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे शिवराय संचलन भारतीय रिझर्क्ह बँक, अमर बिल्डिंग, फोर्ट मुंबई येथे दुपारी 4 वाजता सुरू होईल. या वेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून जाईल.

शिवराय संचलनाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या शिवराय संचलनात भारतीय कामगार सेना, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांच्या आस्थापनांमधील कर्मचारी-भगिनी, शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या शिवराय संचलनासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष  विलास पोतनीस, सुनील शिंदे व सरचिटणीस प्रदीप मयेकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागप्रमुख, महिला विभाग संघटक हे कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत. शिवराय संचलनात सर्व शिवप्रेमींनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी केले आहे. यासाठी शिवसेना दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे.

फोर्ट ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत संचलन

संचलनाच्या मार्गालरील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. शिवराय संचलनाचा समारोप हिंदुस्थानचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. यानंतर शिवराय संचलनाचा समारोप होईल, अशी माहिती संघटन सचिव उमेश नाईक यांनी दिली.

कला, संस्कृती, परंपरेचे दर्शन घडणार

शिवराय संचलनात भगव्या टोप्या, गमजे घालून कार्यकर्ते तर भगव्या नऊवारी साडय़ा प्रदान करून महिला सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता भारतीय रिझर्क्ह बँक अमर बिल्डिंग फोर्ट येथून ढोल-ताशाच्या गजरात व तुतारी वादनाने प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत शिवराय संचलनाला सुरुवात होईल. फुलांनी सुशोभित केलेल्या वाहनात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल. फुलांनी सजवलेली शिवपालखी वाहून येणारे माकळे असतील. पालखीसोबत वारकरी भजन पथक असेल. दांडपट्टा, ढाल तलवार, लाठीकाठी, बाराबनाटे, चौरंग चक्र यासारख्या शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जातील. याशिकाय ढोल-ताशा पथक, नाशिव बाजा, लेझीम पथक असेल. संचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाईल.