पुण्यामध्ये ‘वॉशिंग मशीन’ नकोच!

पुण्यात हुकुमशाहीसारखं वातावरण आहे. त्याविरोधात मी काम करत आहे. सगळेच लोक पुण्यामध्ये ‘वॉशिंगमशीन’ नको या विचाराचे आहेत. मी देखील याच विचाराचा असून मला लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

मनसेमधून बाहेर पडल्यानंतर आज मुंबईमध्ये प्रभादेवी येथे दै. सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची वसंत मोरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोरे म्ह्णाले, मी माझी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मांडली आहे. मला वाटतं, मला संधी मिळेल. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटत आहे. पुणेकरांच्या हितासाठी मला काम करायचे आहे.

महाविकास आघाडीमध्ये तुम्ही प्रवेश करणार का, या प्रश्नावर मोरे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्ह्णाले, अजून भेटीगाठी सुरू आहेत. मागच्या दाराने मी भेटत नाही. थेट जाऊन भेटतोय. सगळय़ा चर्चा सकारात्मक होत आहे. सर्वजण त्याचा विचार करतील.

पुण्यामध्ये लोक म्हणतात ‘वॉशिंग मशीन’ नको. मीसुद्धा याच मताचा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मी भेटलो. काँग्रेसकडे जागा आहे म्हणून मी मोहन जोशी यांना भेटलो. आमदार रविंद्र धंगेकर यांच्याशी पह्नवर बोलणे झाले आहे. पुण्यात गेल्यावर त्यांनाही भेटल. लोकसभा निवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे. ज्या विषयासाठी मी मनसे पक्ष सोडला, त्यापासून मी लांब जाणार नाही, असेही मोरे म्हणाले.