काम उत्तम असेल तर ‘मोदी गॅरंटी’ या जाहिरातीची गरजच काय? शिवसेना मेळाव्यात प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचा सवाल

 ‘मोदी की गॅरंटी’ या जाहिरातीवर रोज 55 ते 60 लाख रुपये खर्च होत आहेत. काम उत्तम असेल तर जाहिरात करण्याची गरजच काय? असा सवाल करत जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे. शिवसेना आक्रमक आहे. पक्षप्रमुखांनी डबल महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाडय़ात आणला आहे. यावेळी महाविकास आघाडीचा खासदार झालाच पाहिजे. परिर्वतनाची सुरुवात सांगली जिह्यातून करा, असे आवाहन शिवसेना उपनेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.

सांगली येथील फल्ले मंगल कार्यालयामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सांगली मतदारसंघातील पदाधिकाऱयांचा आज मेळावा झाला. यावेळी प्रा. नितीन बानगुडे-पाटील बोलत होते. यावेळी सांगली लोकसभेचे संघटक आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा सत्कार करण्यात आला होता. प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, शेतीमालाचे भाव कमी झाले आहेत. दीड लाख बुडवायचे आणि दोन हजार द्यायचे, असा यांचा कार्यक्रम सुरू आहे. बेरोजगारी वाढतच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील युवक नोकरीसाठी बाहेर जातात. पक्ष पळवून नेण्याचे काम सुरू आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे चूक करू नका. पूर्ण ताकदीने मैदानात उतरा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले, आता आपली जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाने पक्षाला वेळ देत मशाल घराघरात पोहोचवा. गद्दारांच्या बुडाखाली आग लावा. 600 पेक्षा जास्त गावे मतदारसंघात असून, यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. निरोपाची वाट न पाहता काम करा. सांगलीचा खासदार आपलाच असेल. अधिक जोमाने कामाला लागा, असे आवाहन केले. यावेळी दिगंबर जाधव, बजरंग पाटील, चंदन चव्हाण यांचेही भाषण झाले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप माने-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. किशोर ठाणेकर, महिला आघाडी जिल्हासंघटक आशा पोद्दार, मेघना हिंगमिरे, मनीषा पाटील, ऋषिकेश पाटील, सिद्धार्थ जाधव, उपजिल्हाप्रमुख सुभाष मोहिते, गौरीशंकर भोसले, मारुती मगर, नितीन शिंदे, राज लोखंडे, दादा भगत, वीरू फाळके, एन. डी. कांबळी, चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम, मयूर घोडके, रुपेश मोकाशी, केदार गुरव, तानाजी सातपुते, पप्पू शिंदे, महादेव होलवान, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.

दिल्लीच्या तख्तावर सांगलीचा भगवा फडकवू – पै. चंद्रहार पाटील

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला सामाजिक काम करण्याची संधी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवीत पूर्ण ताकदीने दिल्लीच्या तक्त्यावर सांगलीचा भगवा फडकवण्याचे काम करीन, असे सांगत पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले, सांगली जिह्यात ड्रायपोर्ट, विमानतळ, द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? लोकसभेत तोंड कधी उघडले का, याचा जनतेसमोर पंचनामा करा, असे आवाहन त्यांनी केले.