भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरूच, हिमाचलमध्ये काँग्रेसला पुन्हा दगाफटका!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हिमाचल प्रदेशात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविलेल्या काँग्रेसच्या सहा बंडखोरांसह 11 आमदारांना भाजपशासित उत्तराखंडमध्ये नेण्यात आले आहे. ऋषीकेशजवळील एका रिसॉर्टमध्ये 11 आमदारांचा मुक्काम आहे. विशेष म्हणजे हरियाणा पोलिसांसह सीआरपीएफचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या घडामोडी पाहता हिमाचलमधील काँग्रेस सरकारला दगाफटका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

गेल्या महिन्यांत राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली काँग्रेसला दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू सरकारचे पूर्ण बहुमत असतानाही काँग्रेस नेते, ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला आणि भाजप उमेदवार निवडून आला. त्यानंतर बंडखोरी करणाऱया सहा काँग्रेस आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आणि भाजपला झटका दिला. हिमाचल प्रदेशातील सुख्खू सरकारसमोरील संकट टाळल्याचे वाटत असताना आता पुन्हा भाजपने आमदारांची पह्डापह्डी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री सुख्खू हे शुक्रवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. सायंकाळी ते सिमला येथे परतल्यानंतर बंडखोरी झाल्याचे समजले. सहा बंडखोर आमदार, तीन अपक्ष आणि दोन भाजपचे आमदार खासगी विमानाने चंदीगडला गेले. तेथून अज्ञात स्थळी गेल्याची माहिती सुख्खू यांनी पत्रकारांना दिली. हे आमदार चंदीगडहून उत्तराखंडला गेल्याचे स्पष्ट झाले. आमदारांचा मुक्काम केलेल्या रिसॉर्टबाहेर हरियाणा पोलीस आणि सीआरपीएफ पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ही कसली लोकशाही
सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत या आमदारांना ठेवण्यात आले आहे. ही कसली लोकशाही, असा सवाल मुख्यमंत्री सुख्खू यांनी केला. घोडेबाजारामुळे लोकशाही कमजोर होते हे लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये गेलेला एकही आमदार आपल्या संपर्कात नसल्याची ते म्हणाले. या 11 आमदारांमध्ये रजिंदर राणा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, चैतन्य शर्मा, देवेंद्रकुमार भुट्टो हे सहा काँग्रेस बंडखोर. अशिष शर्मा, होशियार सिंह,के. एल. ठाकूर हे तीन अपक्ष.

विधानसभेत काय आहे स्थिती?
एकूण संख्याबळ 68
बहुमतासाठी 35
काँग्रेस 40
भाजप 25
अपक्ष 03