दिल्लीच्या मोगलशाहीपुढे गुडघे टेकणार नाही; संजय राऊत यांचा निर्धार

दिल्लीच्या मोगलशाहीपुढे गुडघे टेकणार नाही, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी घेतल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी त्यांच्यापुढे गुडघे टेकले त्यांनी क्लिनचीट मिळाली. मात्र, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसे आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दिल्लीपुढे गुडघे टेकणार नाही, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तुम्ही आमच्या पक्षात या, आमच्या वॉशिंग मशीनमधून निघून तुमच्या सर्व गोषअटी क्लिअर होतील, असे भाजपचे धोरण आहे. रोहित पवार यांना आपण ओळखतो. रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबिय कोणतेही बेकायदा कृत्य करणार नाही. जरंडेश्वर साखर कारखान्याचे काय झाले, ते तपास यंत्रणांनी सांगावे. त्यांनी अजित पवार यांना सर्व प्रकरणांमध्ये क्लिन चिट दिली आहे. सिंचन घोटाळा, कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा, असे एनेक घोटाळे आहेत. आता ते भाजपसोबत आल्याने त्यांना क्लिनचीट मिळाली आहे.

भाजपविरोधात लढणाऱ्या स्वाभिमानी लोकांना गुडघ्यावर बसवण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे. असे करत लोकसभा निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, संजय राऊत, रोहित पवार, अनिल देशमुख, शरद पवार आम्ही भाजपसमोर गुडघे टेकणार नाही. आम्ही लढणारच आणि एक दिवस त्यांनाच आमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील. रोहित पवार यांच्याविरोधात तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जात आहे. असा कोणता गुन्हा रोहित पवार यांनी केला. उद्योग- व्यवसाय आहे. त्यात काही गोष्टी इथे तिथे झाल्या असतील. त्यासाठी धाडी टाकून त्यांची संपत्ती जप्त करत त्यांनी बदनाम करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रावर करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाहीपुढे कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे, महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजित पवार गप्प बसून हे पाहत आहे. मात्र, आम्ही त्याविरोधात उभे आहोत. आमच्यावर कारवाया झाल्या, आणखीही होतील, मात्र, आम्ही त्यांच्यापुढे गुडघे टेकणार नाही. रोहित पवार यांच्यावरील कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी काय भाजपमध्ये जायला हवे, तसे फडणवीस यांनी सांगावे, राहित पवार भाजपमध्ये आले तर कारवाया थांबवतो, असे त्यांनी स्पष्ट करावे.मात्र, रोहित पवार कोठेही जाणार नाहीत. ते त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यांनी कारवाया कराव्यात, आणखी किती खोट्या कारवाया करणार, असा सवाल करत हा स्वाभइमानी महाराष्ट्र आहे. हा दिल्लीच्या मोगलशाहीपुढे वाकणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. त्यांनी कारवाई करावी, आम्ही लढत राहू आणि एकवेळ अशी येईल की त्यांना आमच्यापुढे गुडघे टेकावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांच्यावर जशी कारवाई सुरू आहे, तशी अजित पवार यांच्यावरही झाली. त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपत पळून गेले. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचे पुरावे ईडीने दाखवले, ते भाजपत गेले.त्यानंतर कारवाई थांबली. हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाया थांबल्या. मात्र, मी आणि माझे सहकारी स्वाभिमानी मराठी मणसे असल्याने त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यास तयार नाही. आमच्यासारखे स्वाभिमानी असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानिक करण्याची भाजपची इच्छा फलद्रुप होणार नाही, असेही संजय राऊत यांनी खडसावले.

स्वाभिमानासाठी पक्ष सोडल्याचे सांगणारे आता दिल्लीत व्यापाऱ्यांची भआंडी घासत आहेत, दोनचार लोकसभेच्या जागेसाठी दिल्ली दरबारी झुकत आहेत. या डुप्लिकेट लोकांना पाच जागांचे तुकडे फेकल्याची बातमी समजत आहे. अजित पवार यांनाही दोनचार जागा देत आहेत. त्यामुळे या डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नयेत, त्यांचा अस्त जवळ आला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.जे बिल्डर त्यांच्या कॅप्लेक्समध्ये मराठी माणसाला जागा देत नाही, त्यांच्याकडून शिंदे गटाला शाखेचे उद्घाटन करून घ्यावे लागते, यापेक्षा मराठी माणसाचा अपमान काय असू शकतो, असा सवालही त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत. आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. प्रकाश आंबेडकर स्वाभिमानी आणि लढाऊ नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांची बाजू समजून घेत, त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.