मिंधे-अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार, उपमुख्यमंत्र्यांनीच दिली अप्रत्यक्ष कबुली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी आपली पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. महायुतीच्या जागावाटपाचे घोंगडे अद्यापही भिजत पडलेले असून यावरून रोज राजकीय वादाचे फटाकेही फूटत आहेत.

पक्ष आणि चिन्ह बळकावले असले तरी दोन्ही गटांकडे आवश्यक जनाधार नाही. त्यामुळे भाजपने दोन्ही गटांना जास्तीत जास्त उमेदवार कमळ चिन्हावर लढण्याची अट घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जिथे जिंकण्याची क्षमता असेल तोच मतदारसंघ दिला जाईल, अवास्तव मागणी करू नका, असा दम भरला आहे.

‘अबकी बार 400 पार’चा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेऊन मिंधे आणि अजित पवार गटाला थोड्या जागांवर गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मिंधे-अजित पवार गटाचे नेतेही अस्वस्थ आहेत. आता जागावाटपाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केले आहे. यावरून मिंधे-अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चांना त्यांनी अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे.

माध्यम प्रतिनिधींनी जागावाटपाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. मी, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसात बसणार असून त्यानंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल. तसेच आमचे चिन्ह घड्याळ आहे. त्यामुळे शक्य तितके उमेदवार आमच्या चिन्हावर लढवण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

दमदाटी कराल तर याद राखा, मला शरद पवार म्हणतात!

दरम्यान, भाजपने केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करू नये, विश्वासघात करू नये अशी टिप्पणी मिंधे गटाकडून केली जात आहे. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले की, यावर मी बोलणार नाही. मी माझ्या पक्षाबाबत बोलेन. पण सर्व घटकपक्षांनी एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. मान दिला पाहिजे आणि सहकार्य केले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. तसेच ‘शिंदे गटाला जेवढ्या जागा, तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात’, या छगन भुजबळांच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य केले. छगन भुजबळ यांनी तशी इच्छा व्यक्त केली असून इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र याबाबत आम्ही एकत्र बसून ठरवू, असेही अजित पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)