अटल सेतूजवळ 124 गावांची तिसरी मुंबई, सिडकोला डावलून मुख्यमंत्री चेअरमन असलेल्या एमएमआरडीएवर जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अटल बिहारी वाजपेयी म्हणजेच अटल सेतू परिसरात तब्बल 124 गावांचे मिळून तिसरी मुंबईच्या नावाखाली नवीन शहर विकसित करण्याची योजना मिंधे सरकारने आखली आहे. या शहराच्या उभारणीचे काम सिडको ऐवजी मुख्यमंत्री चेअरमन असलेल्या ‘एमएमआरडीए’वर सोपवण्याचा निर्णय झाला आहे.

मुंबई, नवी मुंबई नंतर आता अटल सेतूजवळ तब्बल 323.44 चौरस किमीच्या क्षेत्रात तिसरी मुंबई उभारण्याची योजना या सरकारने खाली आहे. अटल सेतू आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी पनवेल व उरण परिसरात तिसऱया मुंबईची योजना आखली आहे वास्तविक या क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोवर जबाबदारी पूर्वीपासून आहे. पण आता सिडको ऐवजी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्याची शासनाची योजना आहे.

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान प्रवासाचा वेळ वाचवून कमी वेळा हे दोन प्रदेश जोडले जावेत यासाठी राज्य शासनाने अटल बिहारी वाजपेयी (मुंबई पारबंदर सेतू) ‘अटल सेतू’ म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) या प्रकल्प उभारला. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील प्रवासाचे अंतर कमी झाले असून त्यातून आजूबाजूच्या प्रभाव क्षेत्राचा आर्थिक तसेच सर्वांगीण विकास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील क्षेत्रांचा योग्य, सुव्यवस्थित आणि जलद विकासाचे नियोजन, समन्वय व पर्यवेक्षण यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून 2019 मध्ये या प्राधिकरणाच्या प्रदेशाची हद्दवाढ केली आहे. यात नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रामधील 80 गांवे, खोपटा नवनगर अधिसुचित क्षेत्रामधील 33 गांवे, मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रामधील 2 गांवे व रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रामधील 9 गांवाचा समावेश आहे. नवीन शहर विकसित करण्याच्या अनुशंघाने राज्य सरकारने तीस दिवसात हरकती व सुचनाही मागवल्या आहेत.

मिंधेंच्या बिल्डर मित्रांसाठी कुरण
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गल्ला जमवण्यासाठी तसेच नव्या शहराच्या नावाखाली आपल्या बिल्डर मित्रांसाठी नवे कुरण देण्याच्या उद्देशाने मिंधेंनी हा प्रकल्प रेटल्याची चर्चा आहे. त्यासाठीच जाणीवपूर्वक सिडकोला दूर ठेवून स्वतःकडे सूत्रे असलेल्या एमएमआरडीएकडे हा प्रकल्प सोपवण्याचा निर्णय मिंधेंनी घेतल्याचे बोलले जाते.