‘बेस्ट’ची पास दरवाढ मागे घ्या! आदित्य ठाकरे यांची मागणी

‘बेस्ट’ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज 35 लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. असे असताना ‘बेस्ट’ने अचानक ‘बेस्ट’ पास दरवाढ केल्याने लाखो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे ही दरवाढ ‘बेस्ट’ने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून केली आहे.

सर्वसामान्य   मुंबईकरांच्या प्रवासाचे प्रमुख साधन असलेल्या ‘बेस्ट’चा मासिक मास 750 रुपयांवरून 900 रुपयांवर तर दैनंदिन पास 50 रुपयांवर 60 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच मासिक पासात 150 रुपये तर दैनंदिन पासात दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसणार आहे. ‘वाजवी किमतीत उत्तम प्रवास’ अशी बेस्टची ओळख आहे. त्यामुळे ही वाढ अन्यायकारक असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. प्रचंड महागाई वाढलेली असताना ‘बेस्ट’चा प्रवास महागणे योग्य नाही, असे सांगत ही पास भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.