विविध न्याय्य मागण्यांसाठी यवतमाळ येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

नैसर्गिक कोपामुळे होत असलेली सततची नापिकी आणि केंद्र तथा राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण ह्यामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरीराजा अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडला आहे. घाम गाळून शेतात सोन्याचे मळे फुलविणारा बळीराजा नापिकी व शेत मालाला न मिळणाऱ्या योग्य भावामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाला आहे. ह्यामुळे कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेली आपल्या देशाची अस्मिता निश्चितच कलंकित होत आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चात हजारो शेतकरी, शेतामजूर यांनी सहभाग घेतला.

सोयाबीनला 7000 रुपये व कापसाला 10000 रुपये प्रति क्विंटल भाव तथा शेतकऱ्यांच्या इतर सर्व शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा, खरीप पिकांच्या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना पीकविम्याचा 100% विमालाभ सरसकट देण्यात यावा, शेतकरी सन्मान निधीची मदत दरमहा 6000 रुपये करण्यात यावी, जुलै, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी,सिंचनासाठी शेतकऱ्यांना दिवसा वेळेवर वीज देण्यात यावे, घरकुल निधीत ग्रामीण भागाकरिता 2.5 लाख रुपये व शहरी भागाकरिता 4 लाख रुपये वाढ करण्यात यावी, नेर शहरातील व ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमण धारकांना लिज पट्टे तात्काळ देण्यात यावे, शेती उपयोगी साहित्य आणि रासायनिक खताचे भाव कमी करण्यात यावे, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे दर 500 रुपये करण्यात यावे आणि डॉक्टर स्वामींनाथन कमिटीच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्या आदी विविध यावेळी मागण्या करण्यात आल्या.

स्वतःच्या न्याय्य मागण्या मान्य करुन घेण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल माणिकरावजी ठाकरे आणि नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात यां हजारो शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फत सरकारला निवेदन दिले.यावेळी मोर्चात राहुल ठाकरे, विनायक भेंडे, प्रवीण देशमुख, रत्नाताई मिसळे, अनिल जळगावकर, दिलीप खडसे, सत्यविजय गुल्हाने, रामुकाका धोटे, गणेश खोंड, पियुष अजमिरे, अतुल राऊत, पुंडलीक गावंडे, आशीष राऊत, रमेश चौधरी, भीमराव ढबाले, संजय राठोड, उमेश ढगे, जानराव राठोड आदींचा सहभाग होता.