उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य आणि दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखामधील शब्दप्रयोग याबद्दल भाजपा आमदार राम कदम यांनी आज उद्धव ठाकरे तसेच दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी तो प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठविण्याचे निर्देश दिले.

10 जानेवारी 2024 रोजी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर अध्यक्षांनी हा निकाल घेऊन जनतेला सामोरे जावे, असे म्हटले होते. दुसऱया दिवशी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामध्ये नार्वेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला गेला होता असे आमदार कदम यांनी सभागृहात सांगितले. विधिमंडळाला चोरमंडळ तर विधानसभा अध्यक्षांना निवडणूक आयोगाचे डोमकावळे, याशिवाय अग्रलेखात लोकशाहीची हत्या, काळा दिवस, दिल्लीहून लिहून आलेली स्क्रीप्ट असे शब्दप्रयोग केले गेले होते, असे कदम यांनी सांगितले. हा विधानसभा अध्यक्षांचा अवमान असल्याचे कदम यांनी म्हटले.