डीप क्लिनिंगच्या नावाखाली पाण्याची नासाडी थांबवा! आदित्य ठाकरे संतापले

वरळी सी फेसवर महापालिकेच्या एका टँकरमधील पाणी कामगार रस्त्यावर फवारण्याऐवजी डिव्हाईडरवर फवारत असल्याचा व्हिडिओ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रसारित करून राज्य सरकार आणि महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे. मुंबईत सध्या पाणी कपात सुरू आहे. मात्र डीप क्लिनिंगच्या नावाखाली राज्य सरकारच्या आदेशाने मुंबई महापालिका पाण्याची अशी नासाडी करत आहे. पाण्याच्या एका टँकरची किंमत अशी मातीमोल ठरत आहे. टँकरचे पाणी डिव्हाईडरवर फवारणारा हा कामगार नक्की काय करत आहे ते मला सांगा. डीप क्लिनिंगची मूर्खपणाची कल्पना राबवून राज्यातील खोके सरकार किती अकार्यक्षम आहे तेच दाखवून देत आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.