शिवसेनेचा दणका, दीड वर्षाची प्रतीक्षा संपली; अंधेरीचा गोखले ब्रिज अखेर सुरू

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले ब्रीजचे काम गेल्या आठवडाभरापासून पूर्ण असताना केवळ घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगत पालिकेकडून लोकार्पण केले जात नसल्याची पोलखोल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल ‘एक्स’वर केल्यानंतर अवघ्या दुसऱयाच दिवशी या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. या पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्यामुळे अंधेरी, सांताक्रुझ परिसर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककाsंडी फुटण्यास मदत होणार असल्याने दीड वर्षानंतर मोठा दिलासा मिळणार आहे.

गोखले ब्रीज 1975 मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाचा काही भाग 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाची दुरुस्ती होऊन तो पुन्हा सुरू होण्यासाठी पालिकेने दिलेल्या तीन डेडलाइन चुकल्याने परिसरात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. पुलाची एक लाइन आज सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.