कमळाबाईच्या पदराखाली लपून निवडणूक लढण्याची नड्डांची मिंधेंना ऑफर, संजय राऊत यांचा टोला

मिंधे आणि अजित पवार या दोघांनी पक्षचिन्ह चोरले आहे. त्यामुळे भाजपने अजित पवार आणि शिंदे गट या दोन्ही गटाच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर लढण्यास सांगितले आहे. कारण धनुष्यबाण आणि घडय़ाळ चिन्हावर लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढा असा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिला आहे. हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे, असे आव्हान शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिले.

किल्ले रायगडावर आयोजित सोहळय़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाचे आज अनावरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजवणार आहे. शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचे वातावरण आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ हे अत्यंत चांगले व ऐतिहासिक चिन्ह मिळाले आहे. महाराष्ट्रात खरी शिवसेना ही ‘मशाल’ चिन्ह आणि शरद पवार यांचा पक्ष ‘तुतारी’ चिन्ह घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल. मात्र ज्या दोन्ही गटांनी चिन्ह चोरले आहे त्यांना त्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची हिंमत होत नाही. भाजपलासुद्धा या फुटलेल्या दोन्ही गटांना त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे धाडस नाही, असे संजय राऊत म्हणाले.