वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी (59) यांचे आज सकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.
राजेंद्र पाटणी यांना गंभीर आजाराचे निदान झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना पाटणी यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. वाशीम जिह्यातील भाजपचे अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून पाटणी यांची ओळख होती. सुरुवातीला म्हणजे 1997 ते 2003 यादरम्यान त्यांनी अकोला-बुलढाणा-वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी झाले होते. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश डहाके यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाटणी यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. अभ्यासू, अत्यंत मृदू स्वभाव आणि वाशीम जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेले नेते म्हणून पाटणी यांचा परिचय होता.