आम्हा विरोधकांवर विषप्रयोग करुन मारलं जात नाही हे आमच्यावरती उपकारच, संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी केली आहे. ”विरोधकांच्या बाबतीत मोदी तरी वेगळे काय वागतायत? फक्त अजून आम्हाला तुरुंगात घालून मारलं जात नाही. रस्त्यावर गोळ्या घातल्या जात नाहीत. आम्हा विरोधकांवर विषप्रयोग करुन मारलं जात नाही हे आमच्यावरती उपकारच म्हणायचे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

पुतिन व अन्य काही देशांमध्ये ज्या प्रकारे विरोधकांना खतम केलं जातय. ते पाहता हिंदुस्थानात भाजप 2024 ची निवडणूक घोटाळे करुन जिंकण्याचा प्रयत्न करेल. जर असं झालं तर ही देशातील लोकशाहीतली शेवटची निवडणूक ठरेल. पुढे संजय राऊत म्हणाले, चंदीगड महापौरपदाच्या निवडणूकीत जो प्रकार झाला तो सर्वोच्च न्यायालयाने आता तरी रोखलेला आहे. पण या देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन सुरू आहे, पण कोणताही मीडिया त्याला महत्त्व देत नाही. या देशामध्ये काळ्या पैशांचा वापर करुन आमदार, खासदार, नगरसेवकांना खरेदी केले जात आहे. मीडियाला याचे गांभीर्य कळायला हवे असेही ते म्हणाले.

या देशामध्ये ईडीचा, केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्ष फोडले जात आहेत आणि भाजपमध्ये त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आणले जात आहे. ही जी लोकशाहीतील नांदी आहे ही काही चांगली लक्षणं नाहीत. महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्य असतील, प्रत्येक ठिकाणी ईडीचा वापर केला जातो आणि जे काम करणारे आमच्यासारखे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासमोर या माध्यमातून आव्हान उभे केले जात आहे. शिवसेना असेल, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन असतील आम्ही सर्व लोकं आजही या हुकूमशाहीविरुद्ध लढायला उभे आहोत आणि आम्ही लढू, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी दाखवला.

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, मी या आंदोलनाबाबत माहिती घेण्यासाठीच दिल्ली इथे आलो आहे. माझ्या माहितीनुसार शेतकरी आता दिल्लीपासून अडिचशे ते तीनशे मीटर दूर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना सगळ्यांना माहित आहेत. पक्षामध्ये याविषयावर चर्चा झाली. इतकं मोठं आंदोलन या शेतकऱ्यांचे सुरू आहे. एमएसपी म्हणजे मिनीमम सपोर्ट प्राईस (हमीभाव). हा विषय फक्त पंजाब किंवा हरियाणाच्या शेतकऱ्यांचा नसून ते शेतकरी देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी दिल्लीकडे कूच करतायत. अशावेळेला महाराष्ट्रातून शिवसेनेचे काय योगदान असावे याच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंत्यंत संवेदनशील आहेत. मागच्या वेळेला राकेश टिकैत यांचे आंदोलन झाले तेव्हा मी स्वत: आणि आमचे सर्व सहकारी खासदार त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. पण यावेळेला या सर्व शेतकऱ्यांना अद्याप दिल्लीत येण्यापासून रोखले आहे. त्यांच्यावर बंदुका रोखलेल्या आहेत. भिंती उभ्या केल्या आहेत, रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. मी मुंबईत जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, भाजपचे राज्य महाराष्ट्रात आल्यापासून इथले वातावरण पूर्णपणे बिघडलेले आहे. महाराष्ट्र हा देशाला कायम दिशादर्शक आणि आदर्श होता. आज महाराष्ट्र अत्यंत वेगळ्या मार्गाने जाताना दिसतोय. आज महाराष्ट्रात जे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. ते निर्णायक ठरावं आणि ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांच्या ताटातले काढून न घेता मग मराठा असतील धनगर असतील या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात ही शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.