कर्नाटक, तामीळनाडू उपांत्यपूर्व फेरीत

तामीळनाडूच्या साई किशोरने 4 बाद 180 अशा स्थितीत असलेल्या पंजाबचा दुसरा डाव 231 धावांत गुंडाळत 71 धावांचे विजयी लक्ष्य एक फलंदाजाच्या मोबदल्यात गाठले आणि ‘क’ गटातून अव्वल स्थान पटकावत रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच कर्नाटकला फॉलोऑन लादलेल्या चंदिगडचा दुसरा डाव गुंडाळण्यात अपयश आले असले तरी ते पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तेसुद्धा बाद फेरीत पोहोचले. त्यामुळे कालपर्यंत गटात अव्वल असलेला गुजरात आपोआप स्पर्धेबाहेर फेकला गेला. त्याचप्रमाणे सेनादल महाराष्ट्रविरुद्ध निर्णायक विजय मिळवण्यात अपयशी ठरला आणि दुसरीकडे विदर्भने हरयाणावर मात करत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावत बाद फेरी गाठली.

गतवर्षीचे चार संघच बाद फेरीत
यंदा रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत गतवर्षीच्या सौराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या चार संघांनाच मजल मारता आली, तर गेल्या वर्षी अंतिम सामना खेळलेला बंगाल तसेच झारखंड, उत्तराखंड आणि पंजाब हे चार संघ यंदा साखळीत बाद झाले आहेत. मात्र गतवेळी साखळीत बाद झालेल्या मुंबई, विदर्भ, बडोदा आणि तामीळनाडू या संघांनी बाद फेरीत प्रवेश करण्याची करामत दाखवली आहे. आता येत्या 23 ते 27 फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱया रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीत विदर्भ-कर्नाटक (नागपूर), मध्य प्रदेश- आंध्र प्रदेश (इंदूर), मुंबई-बडोदा (मुंबई) आणि सौराष्ट्र-तामीळनाडू असे द्वंद्व रंगणार आहे. विशेष म्हणजे, यंदा पश्चिम विभागातील मुंबई, विदर्भ, सौराष्ट्र आणि बडोदा या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे, तर दक्षिणेतील कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश या तीन संघांनी ही किमया साधली आहे. दक्षिणेतील केरळ आणि पुद्दुचेरी या दोन संघांनाच साखळीत हरण्याचे दुःख पचवावे लागले आहे. मध्य विभागातील मध्य प्रदेशने पुन्हा एकदा आपली बाद फेरीतील घोडदौड कायम राखली आहे. गेल्या वर्षीही ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते.

मुंबईच सबसे आगे
मुंबईने कालच आसामचा धुव्वा उडवत आपला विजय साकारला होता आणि यंदाच्या रणजी मोसमातील सर्वाधिक 37 गुण मिळवत आपले 32 संघांतील अव्वल स्थान कायम राखले. तसेच मुंबई आणि विदर्भ या दोन संघांनाच साखळीत पाच विजय नोंदविता आले आहेत. मुंबईने तर पाचपैकी चार सामन्यांत डावाने विजय मिळवत चार वेळा बोनस गुणही मिळवले. तसेच ‘ड’ गटातून अव्वल स्थान पटकावणारा मध्य प्रदेश हा एकमेव असा संघ आहे, जो सातपैकी एकाही सामन्यात हरला नाही, तर ‘अ’ गटातील मणिपूरने सातच्या सातही सामन्यांत हार पत्करली.

विदर्भ, तामीळनाडूचे दमदार विजय
‘अ’ गटातून विदर्भ आणि हरयाणाला निर्णायक विजयाची गरज होती. काल 4 बाद 113 वर असलेल्या विदर्भला निशांत सिंधू आणि जयंत यादवने 205 धावांत गुंडाळल्यामुळे सामन्यात हरयाणाने कमबॅक केले होते. त्यांना 60 षटकांत 296 धावांचे लक्ष्य गाठायचे होते; पण विदर्भच्या उमेश यादव, आदित्य ठाकरे, आदित्य सरवटे आणि अक्षय वखरेने हरयाणाचा डाव 180 धावांतच गुंडाळला आणि विदर्भला उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. विशेष म्हणजे, आज 274 धावांत उभय संघांच्या 16 विकेटस् पडल्या. विदर्भच्या या विजयामुळे सेनादल आणि हरयाणाचे आव्हान संपुष्टात आले. तामीळनाडूने तब्बल सात वर्षांनंतर बाद फेरी गाठताना पंजाबचे सहा फलंदाज 51 धावांत गुंडाळले आणि 71 धावांचे माफक आव्हान सहज गाठत बाद फेरी गाठली. शतकवीर नेहाल वढेरा कालच्या धावसंख्येत केवळ 6 धावांचीच भर घालू शकला आणि तेथूनच पंजाबची घसरगुंडी उडाली.

रणजीपटूंच्या कारकार्दीला निरोप
रणजी करंडकाच्या साखळी सामन्यांच्या शेवटच्या दिवशी पाच दिग्गज खेळाडूंना निरोप देण्यात आला. यात मुंबईचा धवल कुलकर्णी, विदर्भचा फैझ फझल, बंगालचा मनोज तिवारी आणि झारखंडचे वरुण अॅरॉन आणि सौरभ तिवारी यांचा समावेश आहे. या पाचही जणांच्या निवृत्तीची कारणे वेगवेगळी होती. कुणाला राष्ट्रीय संघात स्थान मिळत नव्हते तर कुणाला आयपीएलमध्ये संधी मिळत नव्हती. तर एकाला राजकारणात रस होता म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम केले. अॅरॉन, मनोज आणि फैझने आपल्या कारकीर्दीची ज्या मैदानात सुरुवात केली, त्याच मैदानात क्रिकेटला निरोप दिला. या पाचही खेळाडूंना हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची अल्प संधीसुद्धा लाभली होती.