देशाला अस्थिर करणाऱ्या सरकारला घरी बसवा, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱयांवर ड्रोनमधून अश्रुधूर सोडला, लाठीचार्ज करून जुलूम केला. अतिरेक्यांविरुद्ध जेवढं सैन्यबळ वापरलं जात नाही तेवढं सैन्यबळ शेतकऱयांविरुद्ध वापरलं जातंय, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकार विरुद्ध शेतकरी अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशाला अस्थिरतेच्या मार्गाने नेणाऱया या सरकारला घरी बसवणारच, महाविकास आघाडीचं शेतकऱयांचं सरकार सत्तेवर आणणारच, असा निर्धार त्यांनी केला.

नाशिक आणि सिन्नर येथे बुधवारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. प्रत्येक राज्यात काही ना काही गडबड सुरू आहे. देश एका विचित्र परिस्थितीतून चालला आहे. तीनशे सत्तरावे कलम काढल्यानंतरही लडाखमध्ये आक्रोश आहे. गेल्या आठवडय़ात तीस ते चाळीस हजार नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, त्यांना तेथे त्यांचे राज्य, निवडणुका परत हव्या आहेत, पण तेथे निवडणुका घेण्याची पेंद्र सरकारची हिम्मत नाही. दुसरीकडे काळे कायदे रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणासह इतर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. चायना बॉर्डर आहे की, कश्मीरमधील पाकिस्तानची बॉर्डर आहे, अशी युद्धसदृश परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे. चीन घुसखोरी करतंय, लडाख घेऊन चाललंय, त्यावर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, मात्र दिल्लीकडे जाणाऱया शेतकऱयांना रस्त्यात खिळे टाकून, काँक्रीटचे ब्लॉक टाकून, अश्रुधूर सोडून अडथळे निर्माण केले जातायेत. हा कृषिप्रधान, शेतकऱयांचा देश शेतकऱयांसाठीच नसेल तर तो कोण आणि कोणासाठी चालवतोय, असा सवाल त्यांनी केला.

केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र देशात तयार होत असेल, तर शेतकरी देशासाठी अन्न कसं पिकवणार? राज्यांना काय देणार? असे सांगून ते म्हणाले, घुसखोर आणि अतिरेक्यांसारखी वागणूक शेतकऱयांना दिली जात आहे, हे या देशाचे दुर्दैव आहे. आश्वासन पूर्ण केले तर आंदोलन करण्याची वेळच पडणार नाही, असेही ते म्हणाले. कुठलाही समाज, घटक मंत्रालयापर्यंत मोर्चा घेऊन आला तर त्याच्यावर लाठीचार्ज, अश्रुधूर करायचा नाही, संबंधित खात्याच्या मंत्र्याने मंत्रालयाच्या पायऱया उतरून त्या मोर्चाला सामोरे जायचे आणि तो प्रश्न सोडवायचा, ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लोकशाही होती. आज मात्र शेतकऱयांचे कुठलेही प्रश्न सोडविले जात नाहीत, कर्जमाफी होत नाही. उद्योगपतींचे कर्ज मात्र माफ होते. शेतकऱयांवर अन्याय- अत्याचार करणाऱया या सरकारला घरी बसवून महाविकास आघाडीचं, शेतकऱयांचं खरं सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते यांची भाषणे झाली. या मेळाव्यास शिवसेना, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, पवन जाधव, अंकित प्रभू, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, विनायक पांडे, विलास शिंदे, बाळकृष्ण शिरसाठ, वैभव ठाकरे, नाना पाटील आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक हजर होते.

  • जीएसटी, इन्कम टॅक्सचे आपले हक्काचे महाराष्ट्राचे वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये पेंद्र सरकारकडे आहेत. दक्षिणेच्या राज्यातील सर्व मुख्यमंत्री त्यांच्या हक्काचे पैसे आणण्यासाठी दिल्लीशी लढत आहेत, मात्र महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठलेही प्रयत्न करीत नाहीत. उलट त्यांच्यावर ज्यांनी मेहेरबानी केली त्या दिल्लीश्वरांपुढे ते लोटांगण घालत आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
  • आपल्यासाठी लढणार कोण, असा प्रश्न आहे. राज्य सरकार गप्प असल्यामुळेच उद्योगधंद्यांसह सर्वकाही गुजरातला जात आहे. तुमच्याकडे दोनशेदहा, दोनशेपंधराचे बहुमत आहे, महाशक्ती तुमच्या पाठीशी आहे, तर पेंद्र सरकारपुढे जाण्याची हिम्मत दाखवा, शेतकरी आत्महत्या करतायेत हे सांगा, महाराष्ट्रासाठी मोठं पॅकेज मागा, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
  • शेतकऱयांच्या शेतात रस्ता नाही तसाच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शेतात जायलाही रस्ता नाही. तुम्ही शेतात पायी चालत जातात. पण, हे गरीब मुख्यमंत्री त्यांच्या स्वतःच्या शेतात अमावास्या, पौर्णिमेलाच दोन-दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात. ते कोणती शेती करतात आणि काय पीक घेतात हा संशोधनाचा विषय आहे. पण हे सर्व करून ते राज्य कुठे नेतायेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
  • सध्या भ्रष्टाचाराचे आरोप केले की लगेच भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये जातात असं सुरू आहे. ईडी, इन्कम टॅक्सच्या भीतीने भाजपात जाताय, पक्ष बदलताय, पण कमीत कमी महाराष्ट्राशी गद्दारी करू नका. पक्ष पह्डापह्डीमुळे राजकारण कुठे चाललंय हा विचार करण्याची वेळ आलीय.
  • काँग्रेसमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, वंशवादमुक्त भारत करू, असं भाजप म्हणतंय. भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तेच स्वप्न दाखवलं होतं, पण भाजप कार्यकर्त्यांबद्दलच वाईट वाटतंय, त्यांना दाखवलेल्या स्वप्नांचं काय होणार? राज्यसभेसाठी भाजपसह या सरकारमधील पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिल्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ते काँग्रेसवालेच आहेत, ते वंशवादीही आहेत.
  • मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करायचं आणि महाराष्ट्र संपवायचा, हे यांचं धोरण आहे. हे सरकार जिंकणार नाहीच, पण पुन्हा जिंकलं तर या राज्यातील कलेक्टर, एसपी असे महत्त्वाचे अधिकारी गुजरातधार्जिणे असतील, अगदी विलीन केल्यासारखं होईल. राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडलीय, दिवसाढवळ्या गोळीबार, मारहाण, अपहरणाच्या घटना घडतायेत. राज्यात उद्योगपती येऊ नये यासाठी हे सर्व सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचा आजचे संवाद मेळावे
जळगाव-  दुपारी 12.30 वा.
शिरसोली- दुपारी 2.15 वा.
कासोदा- दुपारी 4.00 वा.
भडगाव- सायं. 5.15 वा.