अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला मंगळवारी न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर मिश्राला दंडाधिकाऱयांपुढे हजर केले होते.
अभिषेक घोसाळकर यांची हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याच्या संशयातून अधिक तपास सुरू आहे. या कटातून मिश्राला काही फायदा झाला आहे का याचीही चौकशी करीत असल्याचे सांगून सरकारी वकिलांनी मिश्राच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ मागितली. तथापि, आरोपीने त्याच्याकडील सर्व माहिती पोलिसांना दिली असून आणखी पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद मिश्राच्या वतीने अॅड. शंभू झा यांनी केला. युक्तिवादानंतर महानगर दंडाधिकारी लक्ष्मीकांत पाढेन यांनी मिश्राची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.