नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सोमवारी भाजपच्या पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू-भाजप यांची सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्वासदर्शक ठरावा वेळी सरकारच्या बाजूने 129 मते पडली. राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) तीन आमदारांनी क्रॉस मतदान केल्याने बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना धक्का बसला, तर काँग्रेस, डावे आणि आरजेडीच्या सदस्यांनी  सरकारचा निषेध करत वॉकआऊट केले.

आम्ही काँग्रेससोबत होतो, परंतु ते एकजूट दाखवण्यात कमी पडले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा जुन्या (एनडीए) जागी आलो आहोत, असे नितीश कुमार म्हणाले,  तर नितीश कुमार हे कर्पुरी ठाकूर यांचे नाव घेतात, परंतु ते आता कुठे बसले आहेत? अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली.