काँग्रेसमधील ‘अशोकपर्व’ संपले! वाहतूक कोंडी व्हाया 167 कोटी ते राजीनामा

>>विजय जोशी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळातील अर्थव्यवस्थेबद्दल मोदी सरकारने श्वेतपत्रिका काढली आणि त्यात महाराष्ट्रातील ‘आदर्श’ घोटाळय़ाचा ओझरता उल्लेख आला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षसदस्यत्वासह आमदारकीवरही पाणी सोडले! अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील ‘अशोकपर्व’ संपले!  15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अशोक चव्हाण यांच्या हाती ‘आदर्श कमळ’ देणार असल्याची जोरदार चर्चा आहे!

‘हेडमास्तर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा घेऊन अशोक चव्हाणांनी थेट मुख्यमंत्रीपद गाठले.  अशोक चव्हाण यांच्या कार्याची महती सांगण्यासाठी त्यावेळी ‘अशोकपर्व’ या विशेष पुरवण्या कोटय़वधी रुपये खर्चून काढण्यात आल्या. अशोक चव्हाणांचे राजकीय विरोधक डॉ. माधव किन्हाळकर यांनी हे प्रकरण चर्चेत आणले. अशोक चव्हाणांच्या उधळलेल्या वारूला ‘आदर्श’ ने ब्रेक लावला. भाजपने हे प्रकरण एवढे तापवले की अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. 1987 मध्ये अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. नांदेड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. नांदेड जिल्हय़ाच्या राजकारणावर त्यांनी प्रभुत्व निर्माण केले. परंतु त्यांच्या राजकारणाचा पसारा जिल्हय़ाबाहेर गेला नाही. 2014 च्या मोदी लाटेतही काँग्रेसच्या निवडून येणाऱया मोजक्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. 2017 मध्ये झालेल्या नांदेड महापालिकेत त्यांनी काँग्रेसला 81 पैकी 73 जागा मिळवून दिल्या. 2019 मध्ये त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. याच वर्षी भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी त्यांना पराभूत केले. 2019 च्या विधानसभेत त्यांनी नांदेडातून काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तसेच महसूल खाते होते.

सोडणार नाही ते सोडेपर्यंत…

गेल्या वर्षी जुलैमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात अशोक चव्हाण यांनी आपण आयुष्यभर काँग्रेस सोडणार नाही, असे जाहीर केले होते. अधूनमधून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा उठत, पण त्यांनी कधी त्याचा इन्कार केला नाही. मिंधे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमके अशोक चव्हाण आपल्या समर्थक आमदारांसह वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. त्यांच्या या कोंडीची चर्चाही बरीच रंगली होती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाच्या निमित्ताने अशोक चव्हाणांचे फलक झळकले आणि सगळय़ांच्याच भुवया उंचावल्या. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात भाजपच्या नेत्यांना डावलून अशोक चव्हाणांच्या कारखान्यांना 167 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यावेळीही त्यांच्या काँग्रेस सोडण्याची चर्चा झाली. परंतु मोठय़ा खुबीने त्यांनी त्याला बगल दिली. मात्र मोदी सरकारची श्वेतपत्रिका आली आणि अशोक चव्हाण अंतर्बाहय़ हादरून गेले. आज सकाळी अशोक चव्हाण यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला अन् काँग्रेसमधील ‘अशोकपर्व’ अस्ताला गेले!