50 लाखांचे हिरे घेऊन नोकर पसार

खाण्यातून दिले गुंगीचे औषध

महिनाभरापूर्वी कामाला लागलेल्या नोकराने महिलांना खाण्यात गुंगीचे औषध देऊन 50 लाखांचे अनकट हिरे घेऊन पळ काढल्याची घटना खार परिसरात घडली. याप्रकरणी खार पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास क्राईम ब्रँच करत आहेत.

तक्रारदार महिला या खार परिसरात राहत असून त्यांचा दागिने बनवण्याचा कारखाना आहे. त्यांच्या घरी काम करण्यासाठी महिनाभरापासून एक नोकर कामाला होता. तसेच गेल्या दहा दिवसांपासून दुसरा नोकर तेथे काम करत होता. ते दोन्ही नोकर स्वयंपाकघरात झोपत असायचे. दोन दिवसांपूर्वी त्यांची पुण्याहून एक नातेवाईक तेथे राहण्यास आली होती. शनिवारी सायंकाळी आचाऱयाने जेवण बनवले. रात्री महिला, त्यांची मुलगी, नातेवाईक आणि मोलकरीण यांनी एकत्र जेवण केले. जेवल्यावर त्यांना त्रास होऊ लागला. त्रास होऊ लागल्याने त्या रूममध्ये झोपल्या. सकाळी तक्रारदार महिला उठल्या तेव्हा घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. तसेच महिलेच्या मुलीला, मोलकरणीला आणि नातेवाईक महिलेला उलटय़ा होत होत्या. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्या बेडरूममध्ये गेल्या. तेव्हा कपाटात सोन्याचे दागिने असलेले बॉक्स जागेवर नव्हते. तसेच ते दोन नोकरदेखील स्वयंपाकघरात नव्हते. चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.