देश काँग्रेसमुक्त झाला नाही, पण भाजप काँग्रेसव्याप्त झाला! उद्धव ठाकरे यांचा हल्ला

काँग्रेसमुक्त देश करण्याची भीमगर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. देश काही काँग्रेसमुक्त झाला नाही, पण भाजप मात्र काँग्रेसव्याप्त झाला, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. निवडणूक आयोगाने लबाडी करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस चोरांच्या हाती सोपवली. आता काँग्रेस अशोक चव्हाणांच्या हाती सोपवतात का हे बघावे लागेल. भेकड, भाकडांची ढिगभर गर्दी भाजपने जमवलीय, आमच्याकडे मुठभर निष्ठावंतांची फौज आहे आणि ही फौज गद्दारांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर तसेच कन्नड येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, युवासेनेचे वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती.

जनतेनेच ठरवले आहे…
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात जेथे जेथे जातोय, तेथे तेथे जनतेमध्ये भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड चीड, संताप दिसून येतोय. हा सगळा रोष पाहिला म्हणजे निवडणुकीत प्रचाराची गरजच नाही, जनतेनेच ठरवले आहे या फोडाफोडीच्या राजकारणाला गाडण्याचे! कितीही दंड थोपटले तरी भाजपचा आता शक्तिपात झाला आहे, त्यामुळे बेडकुळी उठतच नाही. म्हणून त्यांना बेडकुळ्या भाड्याने घ्याव्या लागतात. अबकी पार एवढे पार… अशा गर्जना करतात आणि फोडाफोडी करतात. यांचे असेच चालू राहिले तर चाळिशीदेखील पार करू शकणार नाहीत. त्यामुळेच यांना नितीश कुमार, अशोक चव्हाण, अजित पवार, मिंधे चवीपुरते लागतात. दहा वर्षे प्रामाणिकपणे काम केले असते तर अशी फोडाफोडी करण्याची वेळ आली नसती.

शहराचे नाव बदलताना हे कुठे होते?
शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचे वचन दिले होते. मी मुख्यमंत्री असताना ते वचन पूर्ण केले. पण तेव्हा हे गद्दार कुठे होते? औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करताना एकही गद्दार त्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हता. जे ठरवले, जे बोललो होते ते करून दाखवले असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

असला सत्तार तुम्हीच वाजवा
उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत असताना उपस्थितांमधून अब्दुल सत्तार चोर है… असा पुकारा झाला. त्याचाच आधार घेत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांचा तुफान समाचार घेतला. या शहराला छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा आहे. मान कापली तरी इमान विकणार नाही असा हा कर्तबगार छावा! या शहराला गद्दारीची कीड लागली. भगव्यासोबत गद्दारी झाली. महिलांना शिव्या देणारा, जवानांच्या जमिनी हडपणारा असला सत्तार तुम्हीच वाजवा असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

अशोक चव्हाणांचे भाजपशी गुफ्तगू म्हणजे शहिदांचा अपमानच
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आता त्यांची भाजपशी गुफ्तगू सुरू आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडात भर सभेत अशोक चव्हाणांच्या ‘आदर्श’ घोटाळ्याची लक्तरे टांगली होती. हा शहिदांचा अपमान असल्याचे मोदी त्यावेळेस कंठशोष करून म्हणाले होते. अशोक चव्हाणांना भाजपत घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठवणार आहात का? आणि असे होणार असेल तर पंतप्रधान मोदींसह समस्त भाजप शहिदांचा अपमान करत आहे, असे आम्ही समजू असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.

४५ हजार कोटी कुठे गेले?
मी मुख्यमंत्री असताना शहराचे गुंठेवारी, जलवाहिनीचे प्रश्न मार्गी लावले होते. मनपा सक्षम नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा वाटाही सरकारने भरण्याचे मान्य केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत ४५ हजार कोटींच्या विकास योजना मंजूर झाल्या होत्या. कुठे गेला हा पैसा? काढा याच्यावर श्वेतपत्रिका, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शहरासाठी काय केले प्रश्न तर तसेच आहेत असेही ते म्हणाले.

हॉस्पिटलमधील मृत्यूची जबाबदारी कुणाची?
मुंबई मनपाने कोविड काळात केलेल्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. तेथे आता हे भ्रष्टाचार शोधत आहेत. काही महिन्यांपूर्वी नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह मिंध्यांच्या ठाण्यात औषधांअभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये निष्पापांचे मृत्यू झाले. या मृत्यूला जबाबदार कोण? आता पक्षांतराची साथ सुरू असून त्यावर गद्दारी गाडणे हाच एकमेव उपाय असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

भारतरत्नाचा बाजार मांडलाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्काराचा बाजारच मांडलाय. मनात आले की दिला पुरस्कार. ज्यांना पुरस्कार दिलाय त्यांचे कर्तृत्व आम्हाला मान्यच आहे. त्यांचा अभिमान आहे. स्वामीनाथन यांनाही पुरस्कार दिला. हिंमत असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराना, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्र ओरबाडण्याचे काम सुरू आहे
एक रुपयात पीक विमा, दोन कोटी रोजगार अशा घोषणा सरकारने केल्या होत्या. काय झाले त्याचे? कंपन्या बंद पडल्या. कामगार रस्त्यावर आले. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पळवण्याचे उद्योग चालूच आहेत. महाराष्ट्रावर एवढा राग का? मुंबईतले डायमंड मार्वेâट गुजरातला पळवले. गुजरात आणि इतर देशात भिंत उभारली जात आहे, हे पाप करू नका असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

केंद्रात सरकार आल्यास परतावा जास्त मागणार
भाजपची मुजोरी जनताच गाडणार असून दिल्लीत आघाडीचे सरकार येणार आहे. आपले सरकार आले की किमान २५ ते ३० टक्के करपरतावा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. या पैशातून शेतकरी, आशा वर्कर्स, पोलीस यांचे भले होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विजयाच्या सभेलाच येणार
आमचे हिंदूत्व हे चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे आहे. आजच्या सभेतला उत्साह पाहून निवडणुकीच्या प्रचाराला आले नाही तरी चालेल असे दिसते आहे. पण मी विजयाच्या सभेला येणारच! असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्राण्यांचा अपमान करणार नाही
राज्यात गुंडगिरीने कळस गाठला आहे. पण एवढा फडतूस गृहमंत्री मी पाहिला नाही. फडणवीस या गुंडगिरीचे काही करू शकत नाहीत. अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावर हे म्हणाले, कुत्रा गाडीखाली आली तरी राजीनामा मागतील. माणसाच्या जिवाची अशी किंमत नालायकच करू शकतात. त्यांची तुलना कोणत्या प्राण्यांशी करून मी त्या प्राण्यांचा अपमान करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्याचा जीव जात असताना हे अशोक चव्हाणांशी डील करत होते, कारण तेव्हा हे बेपत्ताच होते असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भर उन्हात गर्दीचे तुफान
शिवसेनेच्या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने गंगापूर, वैजापूर तसेच कन्नड येथे भर उन्हात गर्दीचे तुफान आले होते. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी गंगापुरात लोक उन्हात थांबले होते. वैजापूर येथेही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोकांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. कन्नड येथेही गर्दीचे तुफान उसळले होते.

फटकारे
मी जनतेची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे. ही लढाई जिंकणे एवढेच ध्येय आहे.
डरपोक भ्रष्ट, भेकड लोकांना मी आजही सांगतो आहे की, भाजपमध्ये जा.
जिथे कमी तिथे आम्ही म्हणणार्‍या भाजपमध्ये आज अचानक वक्ते आणि कार्यकर्त्यांची कमी का भासायला लागली ?
भ्रष्ट तितुका मिळवावा भाजप पक्ष वाढवावा, हीच मोदींची गँरटी.
रावणाला शिवधनुष्य पेलले नाही तर या पन्नास खोक्यावाल्यांना काय पेलणार?
आमच्याकडे चौकीदार नाही शिवसेनेचे राखणदार आहेत.
शेतकरी जात मानत असाल तर शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरचे कर्ज अजून का जात नाही ?