लवकरच ‘पाकव्याप्त कश्मीर’सारखा ‘काँग्रेसव्याप्त भाजप’ होणार आहे, उद्धव ठाकरे कडाडले

भाजपने काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती. पण काँग्रेसमुक्त व्हायचा राहिला बाजूला उलट भाजप काँग्रेसमधून इतके लोक घेतोय की काही काळाने पाकव्याप्त कश्मीरसारखा काँग्रेसव्याप्त भाजप होणार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कन्नड येथील जनसंवाद यात्रेत केला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या ढोंगावर टीकेचे आसूड ओढले. उद्धव ठाकरे म्हणाले की, मला नाही वाटत मी तुम्हाला आणखी काही सांगायची गरज हे. मी कुटुंब संवाद करायला आलो आहे. माझ्याकडे मन की बात, ह्याची बात-त्याची बात नाही. माझ्याकडे कुटुंबाची बात आहे. कारण कोरोना काळात मी जी संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. ज्याचं कुटुंब असतं त्याने त्याची जबाबदारी घ्यायची. तसंच, माझ्या या महाराष्ट्राच्या कुटुंबाची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि आता या हुकुमशाहीच्या संकटातही घेतली आहे. मी मैदानात उतरलो आहे. आज भले आपण एकमेकांशी बोलतोय. पण निवडणुकीच्या मैदानात मी तुमच्यासाठी उतरलो आहे, माझ्यासाठी नाही. इमानी मावळे सोबत असतील तर मला बेईमान्यांची पर्वा नाही. किती बेईमान आले आणि गेले. इतिहासात बेईमानांना स्थान नसतं. त्यांची आयुष्यभर गद्दार आणि बेईमान म्हणूनच नोंद केली जाते. सध्या ऊन तापायला लागलं आहे. पण, ऊन जितकं तापलंय, त्याहून जास्त जनता तापलेली आहे. जनता वाट पाहतेय, की कधी एकदा निवडणूक येतेय. इथे एक निष्ठावान आहे. पण दुर्दैवाने संभाजीनगरमध्ये इतर ठिकाणी जी गद्दारी झाली आहे. जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे आणि अशा जिल्ह्यात गद्दारांना स्थान मिळेल का? या जिल्ह्यात गद्दारांची वळवळ खपवून घेणार का? गेल्यावेळी खैरे यांचा थोडक्यात पराभव झाला. कुणी मत फोडली, गद्दारी कुणी केली याची तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे. पण यावेळी मात्र, चूक होऊ द्यायची नाही. कुणी जरी मतं खायला उभा राहिला तरी त्याच्या तोंडात काय भरायचं ते आताच ठरवून ठेवा. पण मत खायला अजिबात द्यायची नाही, असं त्यांनी यावेळी निक्षून सांगितलं.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवरही टीका केली. ते म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. आजसुद्धा अशोक चव्हाण, वाटलं नव्हतं एवढं लवकर जातील. मी राजकारणाचं बोलतोय. कालपरवापर्यंत नीट बोलत होते. पण आज असं.. पण शेवटी कपाळावर शिक्का काय लागणार, गद्दार! मग आयुष्याची कमाई काय, इतकं मिळवलंत पण एका गद्दारीत गमावलंत. मी अशोक चव्हाण यांच्यावर लगेच आरोप करणार नाही. पण, तुम्ही केलेली घोडचूक त्यांना आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र दिल्लीशहांच्या हुकूमशाहीविरुद्ध एका तडफेने उभा राहिला आहे. मी जिथे जातोय, तिथे प्रचंड गर्दी जमतेय. हिंदू तर सोबत आहेतच, मुस्लीम आणि ख्रिश्चनही सोबत येत आहेत. मुंबईत मराठी तर आहेतच, उत्तर भारतीयही सोबत येताहेत. का येताहेत? माझा पक्ष चोरलेला आहे, माझं चिन्हं त्यांनी गद्दारांना दिलेलं आहे. माझ्या हातात तर काहीच नाही. माझे हात रिकामे आहेत. तरीही मोठ्या संख्येने जमताहेत, हीच माझी संपत्ती आहे. संजय राऊत आता म्हणाले की, दिल्लीतले लोक उद्धव ठाकरेंना घाबरतात. कारण त्यांना माहितीये उद्धव ठाकरे एकटा नाही, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातला मर्द आहे. भेकड तुमच्याकडे येतील, घेऊन टाका. तुमच्याकडे भेकडांची सेना असेल. गद्दारांची फौज असेल, पण ती भाड्याची फौज ही माझ्या मर्द मावळ्यांच्या फौजीला टक्करच देऊ शकत नाही.

मी प्रत्येक सभेला सांगतो, भाजपमध्ये मर्दपणा शिल्लक असेल, शक्यता नाहीच. पण, असेल तर तुमच्या सरकारी यंत्रणा ज्या तुम्ही घरगड्याप्रमाणे वापरताय, त्या बाजूला ठेवा आणि खुल्या मैदानात लढायला समोरासमोर या. बघुया कोण जिंकतं आणि कुणाच्या पाठीला माती लागते. कालपासून बिहारमध्ये नाटक सुरू होतं. त्यांनी आमदार शोधण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या घरात घुसवले. पोलिसांच्या बळावर तुम्ही आमदार उचलून आणत असाल तर ही जुलूम जबरदस्ती आहे. तुम्ही ईडी-इन्कम टॅक्स आणि सीबीआय, यांनाही सांगतो की त्यांचे दिवस थोडे राहिले आहेत. नंतर आमचं राज्य येणार आहे, आता गडबड कराल तर उद्या तुम्हाला बघून घेईन. आरोप करून कुटुंबाची बदनामी करणं हे कुठलं हिंदुत्व आहे. हिंदुत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरासमोर लढा दिला होता. पण एकसुद्धा उदाहरण मला असं दाखवा की त्यांनी मित्राला दगा दिला होता. एक सुद्धा नाही.. कारण मित्राला दगा देणारं आमचं हिंदुत्व नाही. जो मित्राला दगा देतो, तो हिंदूच असू शकत नाही. हे आमदार कोणत्या तोंडाने फिरताहेत. मी मोदी सरकार मानत नाही. मी भारत सरकार मानतो. तुमच्या पक्षापुरतं मोदी सरकार असेल, पण माझ्या हिंदुस्थान त्याच्या कित्येक वर्षांपूर्वी जन्माला आला आहे. हे आमचं हिंदुत्व भाजपने जन्माला घातलेलं नाही. मराठवाड्यासारख्या संतांच्या भूमीत आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या प्रयत्नात पडू नये. जो मुस्लीम समाज माझ्यासोबत आला आहे, त्यांना काय माहीत नाही का की मी हिंदुत्ववादी आहे. माझ्या हातात भगवा झेंडा आहे, मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, हे काय मुसलमानांना माहीत नाही, तरीही ते माझ्यासोबत येताहेत. कारण कधीही माझ्या वडिलांनी, आजोबांनी हिंदु धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा आहे, म्हणून कुणाचा द्वेष करायला शिकवलं नाही. जो कुणी देशद्रोही असेल तो जातीपातीधर्माने कुणीही असला तरी त्याला फासावर लटकवा, हे आमचं हिंदुत्व आहे. देशासाठी मरायला तयार असणारा, देशाशी प्रामाणिक असणारा कुणीही असला तरी तो आपलाच, हे आमचं हिंदुत्व आहे.

भाजपच्या दुटप्पी धोरणाचा शेलक्या शब्दांत समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एक घोषणा दिली होती की काँग्रेसमुक्त भारत. काँग्रेसमुक्त भारत तर करताच येत नाहीये, उलट काँग्रेसमधून एवढे लोक ते घेताहेत की जसा पाकव्याप्त कश्मीर आहे तसा आता काँग्रेसव्याप्त भाजप होणार आहे. एक दिवस भाजपवर असा येईल की भाजपचा जो अध्यक्ष असेल तो पूर्वीचा काँग्रेस असेल. कारण, भाजपने फक्त द्वेष पेरला. जातीधर्मात भांडणं लावून त्यावर पोळ्या भाजायच्या, हे यांनी पेरलं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.