मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरू

ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार, सगेसोयऱयांच्या संदर्भात अधिक स्पष्टता कधी आणणार? सरकारवर अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. आरक्षण हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता मराठय़ांशी दगाफटका करू नका, असा स्पष्ट इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, मनोज जरांगे यांनी कोणताही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणबी नेंदी, प्रमाणपत्र तसेच सगेसोयऱयांच्या संदर्भातील अध्यादेश यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारशी संवाद साधण्याचा मार्ग खुला आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पहाटे बदलतो, मग मराठा आरक्षणाच्या निर्णयालाच का वेळ लागतो, असा सवालही त्यांनी केला. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. जो चिथावणीखोर भाषा बोलतो त्याला संरक्षण दिले जाते, असा टोलाही त्यांनी गृह विभागाला मारला. आमच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण मला मराठा समाजाचे संरक्षण आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.