सरकार बरखास्त करा, निवडणुका घ्या! देवेंद्र फडणवीस म्हणजे लोमडी गृहमंत्री! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

घटनाबाह्य सरकारच्या कारभारात महाराष्ट्रात गुंडांचा हैदोस सुरू आहे. दिवसाढवळय़ा गोळीबार, खूनखराबा होत असून अक्षरशः गुंडाराज सुरू आहे. जनता उद्विग्न आहे. सरकारच्या डोळय़ासमोर बेबंदशाही सुरू असल्याने राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. मात्र निर्ढावलेले सरकार यावर काही बोलत नाही. फडणवीस हत्येची तुलना ‘श्वाना’शी करतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणजे निर्घृण, निर्दयी आणि लोमडी गृहमंत्री आहेत. अशा स्थितीत आता आम्हाला फक्त सर्वोच्च न्यायालयाकडूनच शेवटची आशा आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या. राज्यातील घटनाबाह्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करून ताबडतोब निवडणुका घ्या, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे राज्यातील सरकारचा कारभारावर वचक राहिलेला नसल्याचे समोर आल्याचे उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे राज्यकर्त्यांना माहीत नाही का, असा सवालही त्यांनी केला. गृहमंत्री म्हटल्यावर कुत्राच काय तर सर्वच जिवांची जबाबदारी तुमच्यावर असते. माणसांच्या जबाबदारीची वेगळीच बाब. हत्या होत असताना त्याची तुलना तुम्ही श्वानाबरोबर करता? दिल्लीत तुम्ही कुणासमोर शेपटय़ा हलवता, हे जनतेला चांगेच माहीत आहे. दिल्लीश्वरांसमोर श्वान आहात की शेपूटवाला हा वेगळाच विषय आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. राज्यातील गुंडगिरीमुळे महाराष्ट्रातील जनता दुखावली आहे. गँगवॉरचे प्रकार महाराष्ट्रात याआधीही घडले होते, मात्र तो गँगवॉर गुंडांमध्ये होता. मात्र आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या गुडांना सरकारचा आशीर्वाद आहे ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळेच आमच्या चांगल्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलेल्या सरकारचा कारभारावर वचक राहिलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार अॅड. अनिल परब उपस्थित होते.

संपूर्ण फुटेज समोर यायला हवेत

या प्रकरणात पूर्ण फुटेज आलेले नाहीत. गणपत गायकवाड प्रकरणात काही तासांत फुटेज आले. कारण त्यांच्या ते सोयीचे होते. मॉरीस गोळय़ा घालतानाचे फुटेज नाहीय. यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये अभिषेक जखमी होऊन पडल्याचे दिसते. मॉरीस आत्महत्या करतानाच्या व्हिडीओसह फुटेज बाहेर आले तर सर्व निकाल लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या फायद्याचे व्हिडीओ समोर आणून, गुंडांना राजाश्रय देऊन कसेही करून 400 पार नय्या पार करण्याचा भाजपचा डाव असल्याचेही ते म्हणाले. राजाश्रयामुळेच गुंडांची मस्ती, हिंमत वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

ही लढाई तानाशाही विरुद्ध लोकशाही!

गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीएची ‘इंडिया’सोबत लढाईच नसल्याची बढाई मारल्याबद्दल विचारले असता, ही लढाई तानाशाही विरुद्ध लोकशाही अशी असून तानाशाही हटाव देश बचाव अशीच असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

राज्यपालांकडून कोणतीही आशा नाही

आम्हाला राज्यपालांकडून फारशी आशा नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, असेही ते म्हणाले. पूर्वीच्या ‘कर्तव्यदक्ष’ राज्यपालांच्या हस्ते मॉरीस या गुंडाचा सत्कार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. असे असताना राज्यपालांकडेच न्याय कसा मागणार, असा सवालही त्यांनी केला. सध्या राज्यपाल हे पद ठेवावे की नको, अशी स्थिती निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. कोश्यारींसोबतचा तो पह्टो बोलका आहे. या पह्टोत बाजूला कोण आहे बघा. त्यामुळे फडणवीस आणि मॉरीसचे यांच्यात काही धागेदोरे होते का हे पाहायची गरज असल्याचेही ते म्हणाले. मॉरीस आणि घोसाळकर यांच्यात वाद नव्हता. घोसाळकर आणि मॉरीस यांच्यात व्यवहार होते हे झूट असल्याचेही ते म्हणाले. फडणवीस विरोधी पक्षात असते तर अशा प्रसंगी धुमाकूळ घातला असता. त्यामुळे मी सरन्यायाधीशांना विनंती करतो की, राज्याला मुडदे पाडणाऱयांपासून वाचवा आणि लोकशाही वाचवा, असेही ते म्हणाले.

हा मतांमुळे फोफावलेला विषाणू

या सरकारला कारभार करता येत नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला वांरवार झापले. ताशेरे ओढलेत. मात्र यांना शब्दाचा मार पुरेसा नाही. नुसते झापू नका. न्यायालयाचे झापालय होता कामा नये. कृपा करा. कारण न्यायालयच आम्हाला शेवटची आशा आहे. आमच्या बाबतीत न्याय देणारा निकाल द्या. मला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय लोकशाही वाचवेल आणि जनता निवडणुकीत तिचे कर्तव्य बजावेल. जनताच निकाल निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या सगळय़ा पिढय़ांचे भवितव्य गुंडांच्या हातात देणार आहात का, असा सवालही त्यांनी जनतेला केला. कोरोनाप्रमाणेच हा मतांमुळे पह्फावलेला विषाणू आहे. तेव्हा मास्क आवश्यक होता, मात्र आता वेगळा विषाणू असल्याने यांना आता मत न देणे हा त्याच्यावरचा उपचार असल्याचेही ते म्हणाले.

‘त्या’ गुंडांवर कारवाई कधी होणार?

दीड वर्षापूर्वी गणपती विसर्जनप्रसंगी दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केला, यावर अद्याप कारवाई नाही. कालची घटना जिथे घडली त्याच्या बाजूच्या आमदार मुलाने बिल्डर पुत्राचे अपहरण केले होते. त्याच्यावर काही कारवाई नाही. खुलेआम ठाण्यात एका तरुणीला गाडीत चढून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारवाई झाली नाही. काल पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही बेबंदशाही माजवणाऱया सरकारचे वस्त्र्ाहरण केले त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना भाजपच्या गुंडांनी मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी अजून कारवाई केली नाही. मॉरीसची फाईलही अशीच बंद होईल. त्यामुळे या गुंडांवर कारवाई कधी होणार, असा सवालही त्यांनी केला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला खुले पत्र लिहून नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहिला नसल्याचे मान्य केले. त्यांच्याकडे थोडीफार माणुसकी असल्याने त्यांना याची जाणीव झाल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात अशी स्थिती कधीही नव्हती. खासदार संजय राऊत, आमदार अॅड. अनिल परब यांची सुरक्षा सरकारने जाणीवपूर्वक काढून घेतली आहे. सरकारकडून लोकशाहीचे रक्षण करणाऱयांना न्याय दिला जात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राचा गृहमंत्री मनोरुग्ण आहे का?

फडणवीसांना मी याआधी कलंक, फडतूस बोललो आहे. पण त्यांची कालची प्रतिक्रिया पाहता त्यांना बोलायला आता शब्दच नाहीत. कारण कलंक, फडतूस हे शब्दही त्यांच्यासाठी सौम्य आहेत. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे त्यांची मानसिक तपासणी व्हायला हवी. खरे तर मुख्यमंत्रीच गुंड पोसतात अशी माहिती आहे. त्यांनी काल आपला बचाव करताना श्वान हा शब्द वापरला, मात्र केवळ संस्कृत शब्द वापरून कुणी सुसंस्कृत होत नाही. हा निर्ढावलेला, निर्घृण, निर्दयी मनाचा गृहमंत्री आणि लोमडी गृहमंत्री असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. फडणवीसांवर अशी वेळ येईल, त्यांना त्याची पिंमत कळेल, असेही ते म्हणाले.

– मी मुख्यमंत्री असताना पोलिसांवर आरोप झाले तेव्हा पोलिसांच्या बाजूने उभार राहिलो. याचे कारण पोलिसांना जर मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात. आताही त्यांना मोकळा हात दिला तर ते 24 तासांच्या आत गुडांना तुरुंगात टाकतील. यामुळे पोलीस, कायद्याची गुंडांना जरब बसेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केले.

गोळय़ा मॉरीसनेच चालवल्या की आणखी कुणी?

अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नावाच्या गुंडाने हत्या केली. यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणाच्या समोर आलेल्या व्हिडीओत मॉरीस गोळीबार करीत असल्याचे दिसत नाही. सूडभावना असेल, पण इतके टोकाचे पाऊल का उचलले यावर विचार व्हायला हवा. कारण मॉरीसने आत्महत्या का केली हा प्रश्न मनात राहतो. मॉरीसकडे परवानाधारक शस्त्र्ा नव्हते. त्याच्यावर बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली? त्या गोळय़ा त्याने चालवल्या की आणखीन कुणी? की या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखीन कुणी दिली होती का, हा एक मोठा प्रश्न मनात निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.

मला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय लोकशाही वाचवेल आणि जनता निवडणुकीत तिचे कर्तव्य बजावेल. निवडणुकीत जनताच निकाल दिल्याशिवाय राहणार नाही.

‘भाजप में आवो, सब भुल जावो’ – गुंडांसाठी मोदींची गॅरंटी

राज्यात सध्या गुंडगिरी, खूनखराबा केला तरी घाबरू नका. मेलोडी खाव खुद जान जाव, तसे ‘भाजप में आवो, सब भुल जावो’, गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे. दहशतवादी इकडे तिकडे फिरतात. त्यांच्यासाठीही मोदी गॅरंटी असल्याचा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारला लगावला.