महाराष्ट्र गुंडांच्या हाती, राष्ट्रपती राजवटीची मागणी

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर आज बोरिवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक अभिषेक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अभिषेक यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड आहे. केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये राज्यभरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे मिंधे सरकारबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडत आहेत. महाराष्ट्र गुंडांच्या हाती गेला आहे. गुंडागर्दी आणि जंगलराज रोखण्यात खोके सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यामुळे तत्काळ सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणीच आज विरोधी पक्षांनी केली.

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या एकामागोमाग एक घटना घडत आहेत. त्यावरून विरोधी पक्षाने सरकारबद्दल रान उठवले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अपयशी, अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे, असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रात गुंडाराज पाहायला मिळत आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गुंड येत आहेत. त्यांच्या बाळराजांनाही गुंड भेटायला येतात. राज्यात गुंडांना कॉन्ट्रक्ट दिली जात आहेत. 8 हजार कोटींचे ऍम्ब्युलन्सचे कॉन्ट्रक्ट कोणाला मिळाले? त्यामध्ये किती माफिया आहेत? मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे बॅनर कोण लावते बघा? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपा आमदार गणपत गायकवाडने गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंचे नाव आले. एकनाथ शिंदेंची चौकशी झाली पाहिजे होती. पण दुसरे कुणी असते तर त्याची चौकशी झाली असती. झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होते, पण महाराष्ट्रात गुंडांना पाठीशी घालणाऱया मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात गुंडांचा नंगानाच

महाराष्ट्र हे गुंड, माफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले आहे. शिंदे-भाजपा सरकारमधील नेते उघडपणे गोळीबार करत आहेत. गुंडांचा नंगानाच सुरू आहे. त्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, असा हल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पुण्यातील पोटनिवडणुकीवेळी दाखलेबाज गुंडांना पॅरोलवर सोडून त्यांचा राजकारणासाठी वापर केला गेल्याचा आरोपही दानवे यांनी केला. सरकारच्या आशीर्वादाने जमिनी बळकावण्याचे, हडपण्याचे उद्योग सुरू आहेत, असे ते म्हणाले. गुंडांचे राज्य असल्याने जनता असुरक्षित बनली आहे, असेही ते म्हणाले.

सत्ताधारीच गुन्हेगार झालेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले. राज्य सरकारचा गुन्हेगारावरचा धाक संपला असून सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहेत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा, असा बोचरा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. भाजपचा आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल बोलताना खरी शिवसेना कोणाची? खरी राष्ट्रवादी कोणाची? असे पारावरच्या इसमाला विचारले तर तो जे उत्तर देईल तोच खरा न्याय, असे ते म्हणाले.

राज्यात अधिकृत गुंडाराज

एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे, तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

घोसाळकरांवर गोळीबार हा प्लॅन

अभिषेक घोसाळकर यांच्यावर प्लॅन रचून गोळीबार केला गेला आहे आणि त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळ्या झाडणे हे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

राजाश्रय आहे तोच जिकंत राहणार

दुसऱया महायुद्धाच्या आधी युरोपमध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. ज्याला राजाश्रय आहे तोच जिकंत राहणार असे चित्र आहे. सत्ताधारी पोलीस दलाचा कापर राजकीय अस्तित्कासाठी करत आहेत. महाराष्ट्र इतका असुरक्षित कधीच नक्हता, असा आरोप आमदार जितेंद्र आक्हाड यांनी केला.

या गोळीबाराची चौकशी करायला पाहिजे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबारप्रकरणी बोलताना अशी घटना महाराष्ट्रात घडायला नको होती, कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला माझे समर्थन नाही, या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. जमिनीच्या वादातून, पूर्ववैमनस्यातून आणि तिसऱया गोळीबाराचे कारण समोर येईल. विरोधक या प्रकरणावरून आरोप करणार, मात्र या तिन्ही वेगवेगळ्या घटना बघितल्या तर वेगवेगळ्या कारणावरून झालेला गोळीबार आहे. हे गोळीबार खासगी पिस्तुलातून झाले आहेत. त्यामुळे यापुढे पिस्तूल देताना सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत की नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

– बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहे.

कडकडीत बंद

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने बोरिवली, दहिसर परिसर हादरला आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला.

ठाकरे कुटुंबीयांकडून सांत्वन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर यांचे अंत्यदर्शन घेतले व घोसाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. उपनेते विनोद घोसाळकर, त्यांची पत्नी वैभवी, अभिषेक यांची पत्नी तेजस्विनी यांच्यासह संपूर्ण घोसाळकर कुटुंबाला उद्धव ठाकरे यांनी धीर दिला.

उद्धव ठाकरे यांची पोलीस उपायुक्तांशी चर्चा

उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर गोळीबाराच्या घटनेबाबत आणि सुरू असलेल्या पोलीस तपासाबाबत अधिकाऱयांकडून माहिती घेतली. परिमंडळ 12 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील आणि अन्य स्थानिक अधिकाऱयांशी त्यांनी चर्चा केली.