हुंदके, अश्रू, हंबरडा आणि तीव्र संताप! अभिषेक घोसाळकर यांच्या निधनाने सारेच हळहळले

दिवसरात्र समाजसेवेसाठी वाहून घेणारा, मध्यरात्री फोन केला तरी क्षणाचाही विलंब न लावता मदतीला धावून येणारा आणि नेहमीच हसतमुखाने रहिवाशांच्या कामासाठी झटणारा आमचा आधार गेल्याची भावना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या अकाली मृत्यूनंतर दहिसरमध्ये आज हजारो नागरिकांनी व्यक्त केली. आपला हक्काचा माणूस गमावल्यामुळे आबालवृद्धांना हुंदके, अश्रू अनावर झाले. अनेकांनी अक्षरशः हंबरडाच फोडला. शिवाय आपल्या नेत्याची नाहक हत्या झाल्यामुळे सर्वांनीच तीव्र संताप व्यक्त केला.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर आज त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी धाव घेतली. सर्वप्रथम समाजकल्याण मंदिर येथे आणि त्यानंतर घोसाळकर यांच्या बोरिवली पूर्व येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी अभिषेक यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी केवळ शिवसेनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आदी पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी गर्दी केली. संपूर्ण परिसरात अभिषेक यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत होते.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार राजन विचारे, विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, आमदार संजय पोतनीस, विलास पोतनीस, सुनील शिंदे, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, काँग्रेसचे भाई जगताप, सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे प्रवीण दरेकर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, अमोल कीर्तिकर, आशीष चेंबूरकर, माजी नगरसेवक संजय घाडी, उपनेता विशाखा राऊत, संजना घाडी, शीतल शेठ-देवरूखकर, बाळकृष्ण ब्रिद, सदानंद परब, विभागप्रमुख उदेश पाटेकर, सुजाता शिंगाडे, राखी जाधव, मिलिंद वैद्य, अंकित प्रभू यांच्यासह शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक आणि रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

धाकटय़ा भावाने दिला अग्नी

अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकसागर उसळला होता. ‘अमर रहे, अमर रहे, अभिषेक घोसाळकर अमर रहे’, ’जब तक सूरज चांद रहेगा, तब तक तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अभिषेक यांच्या पार्थिवाला धाकटा भाऊ सौरभ याने अग्नी दिला.

घोसाळकर कुटुंबावर आघात

अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव सकाळी जे.जे. रुग्णालयातून बोरिवली येथे आणण्यात आले. मुलाचे पार्थिव पाहून विनोद घोसाळकर यांना शोक अनावर झाला. ते स्तब्ध झाले. पार्थिवाजवळ हात जोडून ते बसले होते. त्यांच्या डोळय़ातील अश्रू थांबत नव्हते. आई वैभवी आणि अभिषेक यांची पत्नी तेजस्विनी या तर दुःखावेगाने कोसळल्याच. 9 वर्षांची लेक यश्वी आणि 4 वर्षांचा चिमुकला सतेजही तिथे होता. निरागसपणे ते सगळय़ांकडे पाहत होते. हे सारे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.