गाडीखाली कुत्रा आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल! फडणवीसांचे बेताल वक्तव्य

राज्यात वाढलेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर भाष्य करताना फडणवीस यांनी बेताल वक्तव्य केले. गाडीखाली कुत्रा आला तरी गृह मंत्र्यांचा राजीनामा मागतील, असे ते म्हणाले. आता त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एका तरुण नेत्याचे अशा प्रकारे निधन होणे हे गंभीर असून त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही. अभिषेक घोसाळकर आणि मॉरीस या दोघांचे काही दिवसांपूर्वी बॅनरवर एकत्रित फोटो होते. त्यांच्यात अचानक बेबनाव का झाला, मॉरीसने गोळ्या का घातल्या आणि स्वतःही आत्महत्या केली. चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या असून त्या योग्य वेळी उघड करण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले. पूर्ववैमनस्यातून घटना घडली आहे. सदर बंदुकीचा परवाना घेतला होता का? परवाना नसताना ती बंदूक आली कुठून? याचीही चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले.

विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली असल्याबद्दल पत्रकारांनी या वेळी फडणवीस यांना विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृह मंत्र्यांचा राजीनामा मागतील. घटना गंभीर आहेच. त्यामुळे राजीनामा मागितला म्हणून मला आश्चर्य वाटत नाही. विरोधी पक्षालाही ही हत्या का झाली, याचे कारण माहीत आहे.

फडणवीसांच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगताहेत

‘कुत्रा गाडीखाली आला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘फडणवीस साहेब, विसरू नका, तुमच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगत आहेत,’ अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. शिंदे-फडणवीस सरकार मुंबईत भुंकते आणि दिल्ली मास्टर्सपुढे शेपूट हलवते. भुंकत राहा आणि वाजवत राहा, तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार. तुम्ही महाराष्ट्राची शांतता पूर्णपणे भंग केली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

गुंडाराज बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा

राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभीर्य नसून “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील’’ असे बेजबाबदार वक्तव्य करून त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. त्यांना माणूस आणि कुत्र्यामधला फरकच समजत नाही, असे पटोले म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही, तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. ‘गुंडाराज’ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.