पंजाबमधील अमृतसर पोलिसांना उल्लेखनीय कामगीरी करत अवैधरित्या शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त केला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील गुंडांच्या सांगण्यावरून आरोपी पंजाबमध्ये शस्त्र पुरवत होते. या संपूर्ण रॅकेटमध्ये अमेरिकेतील ह्रुतिक आणि तुरुंगात असलेला कुणाल या गुंडांचा समावेश आहे. आरोपी मध्य प्रदेशमधून शस्त्र खरेदी करायचे आणि संपुर्ण पंजाबमध्ये त्यांची अवैधरित्या विक्री करायचे. सीमाभागातील काही लोकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींकडून पोलिसांनी 10 पिस्तूल आणि 1 रायफल जप्त केली आहे. आरोपी शस्त्र विकण्यासाठी सिग्नल नावाच्या एका अॅपचा वापर करत असल्याची माहिती सुद्धा तपासात उघड झाली.
पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या आम्ही अनेक दिवसांपासून शोधात होतो. आरोपींचे वय 19 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. या सर्व आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल करण्यात आहेत. तसेच सर्व आरोपी अमृतसर आणि तरनतारन येथील रहिवासी आहेत. तसेच अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे बसून सर्व सूत्र हलवणाऱ्या 2 गुंडांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.