किशोर-किशोरी गटात सांगली तर, पुरुष-महिला गटात पुणे अंतिम फेरीत
भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या चारही गटाची उपांत्य फेरी गाठणाऱया सांगलीने किशोर आणि किशोर गटाची अंतिम फेरी गाठली तर पुरुष आणि महिला गटात पुण्याने त्यांना नमवत जेतेपदाच्या लढतीत स्थान मिळवले. आता किशोर गटात सांगलीची गाठ ठाण्याशी पडेल तर किशोरी गटात त्यांच्यासमोर धाराशीवचे आव्हान असेल. तसेच पुण्याचे संघ महिलांमध्ये धाराशीवशी तर पुरुष गटात मुंबई उपनगरशी भिडेल.
कुपवाड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने रंगतदार झाले. किशोरी गटात धाराशीवने कोल्हापूरवर (10-9) 2 मिनिटे 30 सेपंद राखुन एक गुणाने विजय मिळवला.
किशोरींच्या दुसऱया उपांत्य सामन्यात सांगलीने सोलापूरचा (9-4) एक डाव राखून 5 गुणांनी पराभव केला.
किशोर गटात सांगलीने पुण्याचा (13-12) अर्धा मि. राखून एक गुणाने पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात ठाण्याने सातार्याचा (9-6) 1 डाव 3 गुणांनी पराभव केला.
महिला गटात पुण्याने सांगलीवर (18-8) 10 गुणांनी मात केली. पुण्याकडून कोमल धारवाडकर (3 मि. संरक्षण), काजल भोर (5 गुण), दीपाली राठोड (3.10 मि. संरक्षण), स्नेहल जाधव (2.20, 1 मि. नाबाद संरक्षण व 3 गुण) यांनी चांगला कामगिरी केली. दुसऱया उपांत्य सामन्यात धाराशीवने कोल्हापूरला (15-10) 5 गुणांनी हरवत अंतिम फेरी गाठली.
पुरुष गटात पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीला (13-12) 1 डाव 1 गुणांनी सहज नमवले. मुंबई उपनगर विरुद्ध ठाणे हा दुसऱया उपांत्य सामना अटीतटीचा झाला. जादा डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई उपनगरने (27-26) 1 गुण व 1 मिनिट राखून विजय मिळवला. मध्यंतराला (9-7) अशी दोन गुणांची आघाडी उपनगरकडे होती. दुसऱया आक्रमणात ठाण्याने उपनगरचे 10 गडी बाद करून सामन्यातील चुरस कायम ठेवली. दोन्ही डावात मिळून समान गुण झाल्याने जादा डाव खेळवण्यात आला. त्यामध्ये ठाण्याने आक्रमणात 9 गुण मिळवले. उपनगरने आठ मिनिटांत 10 गुण मिळवून हा विजय मिळवला.