हिंदुस्थानच्या ऋतुजा भोसले हिला दुसऱया फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत हिंदुस्थानच्या प्रार्थना ठोंबरे हिने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. एकेरीत दुसऱया फेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित पॅटी वॉलनेट्स हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या ऋतुजा भोसलेचा टायब्रेकमध्ये 7-6(8), 2-6,6-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. हा सामना तीन तास चालला. कोरियाच्या सोहयुन पार्क हिने लकी लुझर ठरलेल्या इटलीच्या पॅमिला रोसटेलोचे आव्हान 6-3 5-7,6-3 असे संपुष्टात आणले. मागील आठवडय़ात एनईसीसी आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या जपानच्या मोयुका उचीजिमा हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत हंगेरीच्या दालमा गल्फीचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
दुहेरीत प्रार्थना ठोंबरे-अरियानी हॉर्तोनो उपांत्य फेरीत
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानच्या प्रार्थना ठोंबरेने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत ग्रीसच्या सापपह् साकीलारिडी व ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हीया ताजाद्रमुल्लाचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. ग्रेट ब्रिटनच्या नैकिता बेन्स व हंगेरीच्या फॅनी स्टोलर यांनी रशियाच्या एनास्तेसीया तिखोनोव्हा व जपानच्या मोयुका उचीजिमाचा 6-2, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.