एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील घरी आज आयकर विभागाने छापा टाकला. कारवाईदरम्यान आयकर विभागाने शर्मा कुटुंबीयांचे मोबाईल काढून घेतले. रात्री उशिरापर्यंत ही आयकर विभागाची कारवाई सुरू होती.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्या पवई येथील एव्हरेस्ट इमारतीतील घरी आज सकाळी आयकर अधिकाऱयांचे पथक आले. कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱयाने शर्मा आणि त्यांच्या पत्नीचा पह्न काढून घेतला. तेव्हा शर्मा कुटुंबीयांनी अधिकाऱयाशी हुज्जत घातली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून एव्हरेस्ट इमारत परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात केले होते. नेमकी छापेमारी कोणत्या प्रकरणात करण्यात आली याबाबत काही स्पष्ट झालेले नाही. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास पथकाने शर्मा यांना अटक केली होती. दोन वर्षे त्याना तुरुंगात राहावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अलीकडेच जामिनावर सुटका केली होती.