कुलाब्यातील श्री रामकथा पालिकेने बंद पाडली

संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावरच सुरू ठेवला कार्यक्रम

अयोध्येत श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने कफ परेडच्या मच्छीमार नगरमधील सुरक्षा गार्डन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 आणि शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु पालिकेने कुणालाही कल्पना न देता या गार्डनला टाळे ठोकत हा कार्यक्रम बंद पाडला आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी गार्डनबाहेरील रस्त्यावर श्री रामकथेचा कार्यक्रम सादर केला.

मानव कल्याणाच्या हेतूने कफ परेडमधील सुरक्षा गार्डनमध्ये 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्रीराम कथेचे आयोजन केले असून पंडित कमलेश उपाध्याय हे श्रीरामकथेचे भक्तिमय निरुपण करत आहेत. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 चे विभागप्रमुख आणि शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी महापालिकेच्या ए वॉर्डचे सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्याकडे परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, अग्निशमन दलाकडून या कार्यक्रमासाठी मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र तसेच ध्वनिक्षेपकासाठी मिळालेली परवानगीदेखील आयोजकांनी पालिकेकडे सादर केली होती. असे असतानाही पालिकेच्या अधिकाऱयांनी परवानगीबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेता आयोजकांना संभ्रमावस्थेत ठेवले.

पहिले दोन दिवस श्री रामकथेचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. गुरुवारी अचानक पालिकेने सुरक्षा गार्डनला टाळे ठोकत कार्यक्रम बंद पाडला. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गार्डनबाहेरील रस्त्यावरच श्री रामकथेचा कार्यक्रम सुरु ठेवला. आमदार सुनील शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, उपविभागप्रमुख कृष्णा पोवळे, बाजीराव मालुसरे, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, विधानसभा संघटक गणेश सानप, माजी नगरसेविका सुजाता सानप, शाखाप्रमुख महेंद्र कांबळे, संतोष पवार, जयवंत नाईक, संतोष घरत, बाळा अहिरेकर यांच्यासह शिवसैनिक आणि रामभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सुरक्षा गार्डनमध्ये भाजपने आयोजित केलेल्या छठ पूजेच्या कार्यक्रमाला तीन दिवस पहाटेपर्यंत परवानगी मिळाली होती. मग आम्ही आयोजित केलेल्या श्री रामकथेच्या कार्यक्रमात खोडा घालण्याचे काम पालिका अधिकारी कुणाच्या सांगण्यावरून करत आहेत, असा सवाल विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे. परवानगी मिळाली नाही तरी आम्ही गार्डनबाहेर हा कार्यक्रम सुरूच ठेवू, असेही त्यांनी सांगितले.