इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही ? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली.

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात !.

दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे ! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई… अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई खुनांचा थरार सुरूच आहे. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली.