कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक, आदित्य ठाकरे संतापले

महाराष्ट्राने यापूर्वी अशी अराजकता कधीच पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे!, अशी कडाडून टीका केली आहे.

अभिषेक घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.