मुंबई पालिकेची हायकोर्टात हमी
शहरातील रस्त्यांच्या फुटपाथवर उभारलेले स्टीलचे खांब (बोलार्ड) व्हीलचेअर वापरणाऱया दिव्यांगांसाठी अडसर ठरत आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिका ताळय़ावर आली. फुटपाथवरील खांब पुढील तीन महिन्यांत हटवू, अशी हमी पालिकेने दिली. त्याची दखल घेतानाच न्यायालयाने या प्रकरणात एमएमआरडीए व एमएसआरडीसीलाही बाजू मांडण्याचे निर्देश दिले.
दादर येथील रहिवासी करण शहा जन्मापासूनच दिव्यांग आहेत. ते व्हीलचेअरचा वापर करतात. पालिकेने फुटपाथवर बोलार्ड बसविल्याने त्यांना शिवाजी महाराज पार्क येथील फुटपाथवरून व्हीलचेअर नेणे अडचणीचे ठरत आहे. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेऊन न्यायालयाने ‘सुमोटो’ जनहित याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.