रेसकोर्सवर मुंबई सेंट्रल पार्क! आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकार बॅकफूटवर

महालक्ष्मी रेसकोर्सवर 120 एकरमध्ये पालिका कोणतेही बांधकाम नसणारे ‘मुंबई सेंट्रल पार्क’ तयार करणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याने पालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. ही जागा मिंधे सरकारच्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचा डाव उधळला गेला असून मुंबईकरांची हक्काची मोकळी जागा वाचली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा ‘एफएसआय’ देऊन घशात घालण्याचा डाव घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचे जाहीर करीत आदित्य ठाकरे यांनी नुकताच हा घोटाळा उघड केला होता. मुंबईकरांना विश्वासात न घेता पालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या काही सदस्यांना धमकावून, दबाव आणून महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा ‘बिल्डर-कंत्राटदार सरकार’च्या घशात घालण्यासाठी हा घोटाळा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उघड केल्याने सरकार हादरले होते. दरम्यान, या पालिका आयुक्तांनी ‘आरडब्ल्यूआयटी’सह नागरिकांशी खुला संवाद साधत या ठिकाणी कोणतेही बांधकाम करणार नसल्याची ग्वाही दिली होती. तर आता आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या रेसकोर्सवर इंग्लंड, अमेरिकेच्या धर्तीवर ‘मुंबई सेंट्रल पार्क’ होणार असल्याचे जाहीर केले आहे.

एकूण 300 एकरचे ग्राऊंंड मिळणार

– पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात तब्बल 175 एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. हे मैदान डॉ. ऍनी बेझंट रोड येथून 25 मीटर रुंदीचा अंडरग्राऊंड मार्ग तयार करून रेसकोर्सवरील ग्राऊंडला जोडण्यात येईल. यामुळे मुंबईकरांना एकूण 300 एकरचे ग्राऊंड मिळणार आहे.

– रेसकोर्सची जागा ही कोस्टल रेक्लम लॅण्ड असल्याने सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड आहे. त्यामुळे या ठिकाणी बांधकामाची एक वीटही रचली जाणार नसून ग्राऊंड तयार झाल्यानंतर या ठिकाणी सर्व मुंबईकरांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
हा घोटाळा उघड केल्यानंतर आयुक्तांनी वक्तव्यात वारंवार बदल केला. त्यामुळे आयुक्तांच्या शब्दाला किंमत आहे की नाही?
रेसकोर्स मिंधे सरकारच्या बिल्डर मित्रांच्या घशात घालण्याचा डाव होता. शिवाय तबेले बनविण्यासाठी पालिका मुंबईकरांचे 100 कोटी देणार होती. मिंध्यांच्या बिल्डर मित्राला अतिरिक्त एफएसआय देण्याचा डाव होता.