मुंबई शहर खड्ड्यातच! सवा वर्षात तिसऱ्यांदा निविदा, पालिका 1362 कोटी रुपये खर्च करणार

मिंधे सरकारने पालिकेच्या कारभारात प्रचंड हस्तक्षेप करीत शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी सिमेंट-काँक्रीटचे करण्याचा घाट घातल्यामुळे पंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने गेल्या सवा वर्षात तिसऱ्यांदा निविदा मागवण्याची वेळ आली आहे. या दिरंगाईमुळे मुंबई शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. पालिकेने 72 किमी रस्त्यांच्या कामासाठी आता नव्याने निविदा मागवल्या असून 1362 कोटी 34 लाख 6 हजार रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता यानंतर निविदा सादर होणे, त्याची वर्गवारी होणे आणि अंतिम पंत्राटदार निवडल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यास पावसाळा उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिंधे सरकारच्या कॉण्ट्रक्टर मित्रांच्या फायद्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून रस्ते कामात होणारा घोटाळा शिवसेनेमुळे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टळला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत वारंवार आवाज उठवल्यानंतर अखेर पालिकेने दक्षिण मुंबईतील रस्ते कामासाठी डिसेंबरमध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे याआधी जाहीर करण्यात आलेल्या निविदेनुसार याच कामांसाठी 1670 कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला होता. मात्र आता याच कामासाठी 300 कोटींनी कमी म्हणजेच 1362 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने पालिकेने आता पुन्हा एकदा नव्याने निविदा मागवल्या आहेत.

शिवसेनेमुळे घोटाळा टळला

मुंबईतील रस्ते कामासाठी पालिकेने काढलेल्या सहा कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. यामध्ये मिंधे सरकारच्या कॉण्ट्रक्टर मित्रांना ही कामे देण्यासाठी वाढीव दराने निविदा काढणे, नियमबाह्यरीत्या वाढीव रक्कम देणे, असे आरोप आदित्य ठाकरे यांनी केली होती.

यासाठी त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह यांना वारंवार पत्र देऊन पाठपुरावा केला. अखेर दक्षिण मुंबईतील रस्ते कामांसाठी नेमलेल्या आणि काम रखडवणाऱ्या मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या पंत्राटदाराचे पंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर 1362.34 कोटींची नवी निविदा प्रसिद्ध केली.

काँक्रीटीकरणासाठी होणारा खर्च

शहर 1,362 कोटी 34 लाख 6 हजार

पूर्व उपनगर 846 कोटी 17 लाख 61 हजार

पश्चिम उपनगर

परिमंडळ – 3 – 1223 कोटी 84 लाख 83 हजार

परिमंडळ – 4 – 1631 कोटी 19 लाख 18 हजार

परिमंडळ – 7 – 1145 कोटी 18 लाख 92 हजार

रस्त्यांची लांबी

शहर विभाग 72 किमी

पूर्व उपनगर  70 किमी

पश्चिम उपनगर 253.65 किमी