अर्थसंकल्पात महाराष्ट्राबाबत दुजाभाव का, समान वागणूक का नाही? आदित्य ठाकरे यांचा सवाल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या अर्थंसंकल्पात उडाण योजनेतंर्गत विमानतळे आणि हवाई वाहतूक विस्तार करण्याचे सीतरमण यांनी सांगितले. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अर्थंसकल्पात महाराष्ट्राबाबत दुजाभाव का करण्यात आला आहे. राज्याला समान आणि न्याय्य वागणूक का दिली जात नाही, असा संतप्त सवाल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे.

गेल्या दहा वर्षांत अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे. देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीने काम सुरू असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सरकार पर्यटन विकासाचे काम करत आहे. तसेच देशातील विमानतळे आणि हवाई सेवांचा विस्तार केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का?, आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशभरातील विमानतळ विस्ताराबद्दल सांगितले. मात्र, या संपूर्ण योजनेत महाराष्ट्राला समान हिस्सेदार का मानले जात नाही? पुण्याच्या प्रस्तावित नवीन विमानतळावर त्या एकही शब्द बोलल्या नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या उद्योग, वाणिज्य आणि शेतीच्या वाढीसाठी पुण्याच्या विमानतळाची खरी गरज आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल. सध्याच्या सरकारला जुन्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यातही रस नाही, जे आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, 5 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही? फक्त महाराष्ट्रावरच हा अन्याय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये केला आहे.

अर्थमंत्र्यांनी 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, आता 3 कोटींचं लक्ष्य असल्याचं सांगितलं आहे. मात्र, दुर्दैवाने, त्यांना आताच तब्बल एका दशकानंतर लक्षात आले आहे की, गरीब, महिला, युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या स्रव घटकांनी मोठ्या आशेने सरकारला मतदान केले होते. दुर्दैवाने दशकभर त्यांना आशेवर ठेवले गेले आणि त्यांच्यासाठी कोणतेही ठोस काम झाले नाही. तसेच या अर्थसंकल्पातही त्यांच्यासाठी घोषणा आणि आश्वासनांशिवाय काहीच नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.