देशाची वाटचाल इराणच्या दिशेनं, 500 वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू! संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये पडलेल्या धाडींपासून ते राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सेंगोल वापरण्याच्या नव्या प्रथेवर भाष्य केले.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनातून सेंगोलसह संसदेत आल्या. या नव्या प्रथेबाबत विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान धार्मिक मिरवणुकीतूनही संसदेत येऊ शकतात. हा देश इराणच्या दिशेने चालला आहे. इराणमध्ये अयातुल्ला खोमैनी याने ज्या पद्धतीने राज्य केले तशीच खोमैनीशाही भारतात आणून हा देश 500 वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत गेल्या 70 वर्षात देत प्रगतिपथावर नेण्यात आला, पण मोदी-शहा व त्यांचे लोकं देशाला 500 वर्ष मागे नेण्याच्या विचारात आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी रात्री अटक झाली. यासाठी 7 हजार जवानांचा फौजफाटा रांचीत आणला होता. झारखंड हे आदिवासी राज्य आहे. पण जसे झुंडशाहीने चंदिगडचे महापौर पद ताब्यात घेतले तसेच झारखंडमधील लोकसभेच्या 7-8 जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत. हेमंत सोरेन या खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरेल म्हणून 7 एकर जमिनीचे जुने प्रकरण काढून त्यांना अटक केली. महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे झाले. पंतप्रधानांनीही त्याचे उल्लेख केले. पण इकडे शिखर बँक घोटाळ्यात काल क्लिन चीट मिळाली, तर तिकडे सोरेन यांना अटक झाली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. हेमंत सोरेन यांच्यापेक्षा गंभीर स्वरुपाचे आरोप आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आहेत. पण आज ते आसामचे मुख्यमंत्री असून सोरेन यांना मात्र अटक करण्यात आली, असेही ते म्हणाले.

रोहित पवार यांचीही आज ईडी चौकशी होणार आहे. रोहित पवारांच्या कारखान्याचा जो विषय आहे, तसाच विषय अजित पवारांच्या जरांडेश्वर कारखान्याचा आहे. लिलिवात घेतलेले कारखाने मुळ किंमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे. जो आरोप अजित पवारांवर आहे, तोच रोहित पवारांवर आहे. पण ईडीच्या दारात रोहित पवार चक्करा मारत आहेत. कारण ते भाजपला मिंधे नाहीत, त्यांच्यापुढे झुकले नाहीत आणि झुकणार नाहीत, असेही राऊत ठामपणे म्हणाले. नितीश कुमार यांच्या निकटवर्तियांवर ईडीच्या धाडी पडल्या आणि दोन महिन्यात ते भाजपवासी झाले. पण महाराष्ट्रात आम्ही वाकलो नाही. झुंडशाहीपुढे झुकणार नाही, असेही राऊत म्हणाले.

मुंबईमध्ये मिंधे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी देण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरही भाष्य करताना राऊत म्हणाले की, नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांनाही निधी नाही. जोपर्यंत तुम्ही भाजपात प्रवेश करत नाहीत तोपर्यंत विकासाच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही. देशाच्या राज्यघटनेच्या विरोधातले तत्व इथे वापरले जात आहे. न्यायाचे समान तत्व इथे वापरले जात नाही.

चंदिगडमध्ये भाजपने केलेल्या गचाळ राजकारणावरही राऊत यांनी निशाणा साधला. पिठासीन अधिकाऱ्यांनी बहुमत असलेल्या आप आणि काँग्रेसची 8 मतं बाद करून भाजपला विजयी केले, ही भारत मातेची हत्या नाही का? पिठासीन अधिकारी सरळसरळ आपला पडलेली मतं पेनाने खोडतात आणि अवैध करताना दिसताहेत. महाराष्ट्रात जो गुन्हा, पाप राहुल नार्वेकरांनी केले, तेच चंदिगडच्या पिठासीन अधिकाऱ्यांनी केले. याबदल्यात नार्वेकरांना पक्षांतर विरोधी चिकित्स समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, आणि त्यांच्या जोडीला आता चंदिगडच्या पिठासीन अधिकाऱ्यांना बसवले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात अनेक बिल्डर, ठेकेदारांवर धाडी पडल्या आहेत. त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी राऊत यांनी केली. या ठेकेदार, बिल्डकरांकडे सरकारमधील मंत्री, आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार, बदल्या, बढत्या, ठेकेदारीच्या माध्यमातून, सरकारी निधीतून मिळणारा पैसा गुंतवला जात आहे. याची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. सर्व माहिती दिल्लीपर्यंत गेली आहे. आता त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले जाईल, ब्लॅकमेल केले जाईल. हे अत्यंत भयानक आहे, असेही राऊत म्हणाले.