ईव्हीएम हटी भाजपा गई; ईव्हीएम है तो मोदी है; संजय राऊत यांचा घणाघात

‘भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे. ईव्हीएमशिवाय तो ग्रामपंचायत निवडणूकही जिंकू शकत नाही, ईव्हीएम हटी भाजपा गई, ईव्हीएम है तो मोदी है,’ असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज सत्ताधाऱ्यांवर केला.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ईव्हीएमवरून भाजपावर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील चांडोल येथे एका दुकानात 200 तर आसाममध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या ट्रकमध्ये 300 ईव्हीएम मशीन सापडल्याची खळबळजनक माहिती त्यांनी दिली. इतकेच नव्हे तर ईव्हीएम बनवणाऱ्या भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकांमध्ये भाजपाचे गुजरातमधील पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यात राजकोट येथील मनसुखभाईंचा समावेश आहे. ईव्हीएममध्ये लावलेला सिक्रेट कोडदेखील त्याच कंपनीत बनतो, असे सांगतानाच लोकशाही निवडणुकीत भाजपा मनसुख पॅटर्न, चंदिगड पॅटर्न आणू पाहत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. 2024 मध्ये निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जाण्याची तयारी आहे. त्यात दोन पॅटर्न आणि दोन फॉर्म्युले आहेत. एक मनसुख भाई फॉर्म्युला जे ईव्हीएमचे डायरेक्टर बनले आणि दुसरा चंदिगड फार्म्युला. ‘आप’ने आणि काँग्रेसने निवडणुका जिंकल्या आहेत, पण भाजपा मानायला तयार नाही. मतपत्रिकांचं अपहरण केलं गेलं, असाही आरोप संजय राऊतांनी केला.

‘इंडिया’ सोरेन, केजरीवालांच्या पाठीशी

हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, सोरेन आणि केजरीवाल नितीश कुमार यांच्यासारखे पलटी मारायला तयार नसल्याची किंमत मोजत आहेत, पण ‘इंडिया’ आघाडी त्यांच्यासोबत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

राहुल नार्वेकरांचाच फॉर्म्युला भाजपने चंदिगडमध्ये वापरला

चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीबाबतही संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर हल्लाबोल केला. चंदिगडमध्ये ‘आप’ आणि काँग्रेसचे पूर्ण बहुमत होते. काँग्रेस आणि ‘आप’चे 20 आणि भाजपचे 14 नगरसेवक आहेत. काँग्रेस आणि ‘आप’च्या बाजूने मतदान झाले असतानाही पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीने आठ मते बाद करून टाकली. ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले, तोच फॉर्म्युला आणि त्याच पॅटर्नने आठ मते बाद केली, असे संजय राऊत म्हणाले.